

Air India Pilot Refuses To Fly : कोच्ची विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI504 फ्लाइटबाबत एक धक्कादायक घटना घडली आहे. टेकऑफच्या अगदी काही क्षण आधी पायलटने थेट विमान उडवण्यास नकार दिला. कारण? विमान प्रवासासाठी योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या विमानात राज्यसभा खासदार जेबी माथेर आणि काँग्रेस खासदार हिबी ईडन देखील उपस्थित होते.
ही घटना 17 ऑगस्ट, रविवार रोजी घडली. फ्लाइट AI504 दिल्लीसाठी रवाना होणार होती. मात्र टेक्निकल अडचणींमुळे विमान रनवेवरून टेकऑफ करू शकले नाही. खासदार जेबी माथेर यांनी याची माहिती दिली, की उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वी पायलटने जाहीर केलं की, हे विमान प्रवासासाठी अयोग्य आहे आणि दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जाईल.
हेही वाचा – Ganesh Chaturthi 2025 : आगमन, पूजाविधी, चतुर्थीचे मुहूर्त आणि विसर्जनाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
त्यांनी सांगितलं, “पायलटने स्पष्टपणे सांगितलं की, या प्लेनने प्रवास होऊ शकणार नाही. सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानात हलवण्यात येईल आणि नवीन फ्लाइट रात्री 1 वाजता रवाना होईल.”
परिणामी, प्रवाशांना बराच वेळ वाट पहावी लागली. ह्या विलंबाबद्दल खासदार हिबी ईडन यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं, “AI504 फ्लाइटबाबत काहीतरी अनोखं घडलं आहे. असं वाटतंय की फ्लाइट रनवेवरून घसरल्यासारखी आहे. AI504 फ्लाइट रद्द करण्यात आली असून, नवीन फ्लाइटची घोषणा झाली आहे, पण अजून बोर्डिंगही सुरू झालेली नाही.”
हिबी ईडन यांच्या मते, ही एअर इंडियाची गेल्या काही दिवसांतली तिसरी फ्लाइट आहे जी Aircraft on Ground (AOG) स्थितीत गेली आहे. म्हणजेच, टेक्निकल बिघाडामुळे ती उडू शकली नाही.
एअर इंडियाचं स्पष्टीकरण काय?
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी ‘लल्लनटॉप’शी बोलताना सांगितलं की, विमानात तांत्रिक समस्या आढळल्यानंतर कॉकपिट क्रूने उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. नंतर हे विमान तपासणीसाठी परत ‘बे’मध्ये नेण्यात आलं. प्रवक्त्यांनी पुढे सांगितलं, “सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आणि त्यांच्यासाठी एक पर्यायी विमान तैनात केलं. कोच्चीतील आमच्या ग्राउंड टीमने प्रवाशांना त्वरित मदत केली.”
सतत बिघाडांची मालिका
गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडिया तांत्रिक अडचणी, फ्लाइट कॅन्सलेशन आणि प्रवासी सेवा या बाबतीत तीव्र टीकेचा सामना करत आहे. १६ ऑगस्ट रोजीही मिलान (इटली) – दिल्ली फ्लाइट शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली होती. कारण – तांत्रिक बिघाड.
जेव्हा ‘लल्लनटॉप’ने एअर इंडियाला विचारलं की, सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांचा विश्वास कमी होतो का? आणि यामागचं मूळ कारण काय आहे? त्यावर एअर इंडियाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा