पाकिस्तानचा लागोपाठ चौथा पराभव, थ्रिलर मॅच जिंकून दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी!

WhatsApp Group

PAK vs SA In Marathi : चेन्नईत रंगलेल्या वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) च्या अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने पाकिस्तानच्या झोळीत पराभव टाकला आहे. आफ्रिकेने पाकिस्तानला अवघ्या एका विकेटने हरवले. पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत भारताच्या पुढे म्हणजे पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आणि आफ्रिकेला 271 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान गाठताना आफ्रिकेची शेवटपर्यंत दमछाक झाली. विजय कोणाला मिळतोय, याची उत्सुकता शेवटपर्यंत ताणली गेली, पण आफ्रिकाने 48व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात 4 विकेट घेणारा आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीला सामनावीर पुरस्कार मिळाला.

पाकिस्तानचा डाव

या सामन्यात पाकिस्तानकडून बाबर आझम आणि सौद शकील यांनी अर्धशतकी खेळी खेळली. बाबरने 50, शकीलने 52 धावा केल्या, तर शादाब खानने 43 धावा केल्या. या खेळीमुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर 46.4 षटकात सर्वबाद 270 धावा केल्या. स्टार वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने दोन्ही सलामीवीरांसह 3 तर शम्सीने 4 बळी घेतले.

हेही वाचा – कर्ज वसुलीसाठी बँकेचे एजंट त्रास देतात? रिझर्व्ह बँकेने काढला नवा नियम!

दक्षिण आफ्रिकेचा डाव

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा फॉर्मात असलेला सलामीवीर क्विंटन डी कॉकने जबरदस्त सुरुवात केली, पण त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. डी कॉकने 24 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने त्याला बाद केले. आजारपणानंतर कमबॅक केलेल्या कप्तान टेम्बा बावुमाने 28 धावांची खेळी केली. या दोघांनंतर रासी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्कराम यांनी अर्धशतकी भागीदारी केली. फिरकीपटू उसामा मीरने डुसेनला (21) बाद करत ही जोडी फोडली. मार्करामचे शतक फक्त 9 धावांनी हुकले. त्याने 7 चौकार आणि 3 षटकांसह 91 धावांची सुंदर खेळी केली. मीरने त्याला बाद केले आणि सामन्यात रंगत निर्माण केली. तत्पूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमने आफ्रिकेचा घातक फलंदाज हेनरिक क्लासेनला (12) लवकर बाद करत सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. पण डेव्हिड मिलर (29) आणि मार्को जानसेन (20) यांनी उपयुक्त खेळी केली. आफ्रिदीने मिलरला तर हारिस रौफने जानसेनला बाद केले. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असताना आफ्रिकेचे 8 फलंदाज तंबूत परतले होते. केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांनी एकेरी धावा घेण्यात दबाव वाढवला. पाकिस्तानला 11 धावांची गरज असताना हारिस रौफने स्वत:च्या गोलंदाजीवर एनगिडीचा एकहाती सुंदर झेल टिपला. पण महाराजने तबरेझ शम्सीसह 47व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. रौफ, वसीम आणि मीर यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment