२९ कोटी कॅश, ५ किलो सोनं..! कोण आहे ही अर्पिता मुखर्जी, जिच्यामुळं ‘ईडी’ला मिळालंय मोठं काम?

WhatsApp Group

मुंबई : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं (ED) बुधवारी पुन्हा कोलकात्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्‍या फ्लॅटमधून सुमारे २९ कोटी रोख (२८.९० कोटी रुपये) आणि ५ किलो सोनं मिळालं. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे १० तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पितानं हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते. हा छापा १८ तास चालला. मुखर्जीकडून आतापर्यंत एकूण ५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

खरंतर, शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीनं नुकतंच पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या जवळची आहे. पाच दिवसांपूर्वीच ईडीला अर्पिताच्या फ्लॅटमधून २१ कोटींची रोकड आणि सर्व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या. अर्पिताला ईडीनं २३ जुलै रोजी अटक केली होती. दुसरीकडं, ईडीच्या या कारवाईनंतर विरोधी पक्ष पार्थ चॅटर्जी यांना टीएमसीच्या मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करत आहेत. एवढंच नाही तर शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीनं पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही चौकशी केली.

ईडीनं बुधवारी सकाळी दक्षिण कोलकातामधील राजदंगा आणि बेलघरिया येथील अनेक ठिकाणी छापे टाकले, ही मालमत्ता कथित अर्पिता मुखर्जी यांच्या मालकीची आहे. अर्पिता मुखर्जीनं ईडीच्या चौकशीदरम्यान या संपत्तीचा खुलासा केला होता. तपास यंत्रणेला त्यांच्या चाव्या न मिळाल्यानं ईडीला या फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजा तोडावा लागला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितलं की, आम्हाला एका गृहसंकुलातील फ्लॅटमधून मोठी रक्कम मिळाली आहे. रोख मोजण्यासाठी तीन नोटा मोजण्याचं यंत्र आणावं लागलं. एवढंच नाही तर फ्लॅटमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत. मंत्री आणि मुखर्जी यांच्या चौकशीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ईडीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं, की अर्पिता तपासात सहकार्य करत आहे, तर पार्थ चॅटर्जी तसं करत नाही.

मेंटेनन्स थकवलाय!

अर्पिता मुखर्जीबाबत एक मजेशीर बाब समोर आली आहे. ज्या फ्लॅटमधून करोडो रुपये वसूल केले जात आहेत, त्या फ्लॅटवर अर्पिता मुखर्जीच्या नावाची नोटीस चिकटवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये अर्पिताच्या नावावर मेंटेनन्सचे ११,८१९ रुपये थकीत आहेत. दुसऱ्या बाजूला, पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल ला गणेशन यांची राजभवनात भेट घेतली आणि चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

कोण आहे अर्पिता मुखर्जी?

अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिनं ओडिशा चित्रपट उद्योगातील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, तर काही तमिळ चित्रपटांमध्येही तिनं काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्पिता पार्थ मुखर्जीसोबत अनेकवेळा राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती पार्थ मुखर्जीसोबत काही कॅम्पेन करतानाही दिसली होती.

Leave a comment