

Mumbra Station Accident : ‘अग्निपथ’ या सैन्यात भरतीच्या नवीन योजनेअंतर्गत भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे येथील मुंब्रा विभागातही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी निघालेल्या एका तरुणासोबत वाईट घटना घडली. अग्निपथ योजनेंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तरुणाचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील रहिवासी असलेला २० वर्षीय रामेश्वर भरत देवरे हा ठाण्यात आला होता. मुंब्रा स्थानकात असताना अचानक त्याची प्रकृती खालावली. रामेश्वरला उलट्या होऊ लागल्या. उलट्या करण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं धावला. तेव्हा त्यानं आजूबाजूला पाहिलं नाही. इतक्यात रेल्वे आली आणि त्याला रेल्वेची धडक बसली. तो जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. उपस्थित लोकांनी तातडीनं पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
हेही वाचा – खारेपाटणच्या विद्युत केंद्राला ‘भीषण’ आग; सिंधुदुर्गातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित
#Shocking #horrible #train accident mumbra station#CCTV#Mumbai #accident @Central_Railway pic.twitter.com/3hIEUrhg9P
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) September 22, 2022
घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्यातील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी रामेश्वरला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना बुधवार २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सांगितली जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धुळ्यातील वडजई गावातील रामेश्वर हा त्याची मोठी बहीण, लहान भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहत होता. अत्यंत साध्या कुटुंबातील देवरे हे सरकारी नोकरीच्या तयारीत होते आणि त्यासाठी ते अग्निपथ योजनेची माहिती गोळा करत होते.