सावधान..! देशाच्या राजधानीत ‘मंकीपॉक्स’चा प्रवेश; ‘अशी’ आहेत या आजाराची लक्षणं!

WhatsApp Group

मुंबई : भारताची राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नाही. यापूर्वी दक्षिण भारतातील केरळ राज्यात मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सच्या पहिला रुग्ण १४ जुलैला त्यानंतर १८ जुलैला दुसरा आणि २२ जुलैला तिसरा रुग्ण मिळाला.

दिल्लीत सापडलेला नवीन रुग्ण मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल आहे. ३१ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल्याची पुष्टी करताना आरोग्य मंत्रालयानं म्हटले आहे, की त्याचा कोणताही प्रवास इतिहास नाही. म्हणजेच आतापर्यंत सापडलेल्या चार रुग्णांपैकी ही अशी पहिलीच घटना आहे, ज्यांचा कोणताही प्रवास इतिहास नाही. या रुग्णाला खूप ताप आणि त्वचेच्या जखमांमुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी स्वतः मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली. तो यूएईहून परतला होता. मंकीपॉक्सची लक्षणं दिसू लागल्यानं त्याला केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या मंकीपॉक्समुळं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) शनिवारी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, मंकीपॉक्सचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) यांच्यानुसार, मंकीपॉक्स पहिल्यांदा १९५८ मध्ये दिसून आला. त्यानंतर संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये हा संसर्ग आढळून आला. त्यामुळे त्याला मंकीपॉक्स असं नाव देण्यात आलं. या माकडांमध्ये चेचक सदृश आजाराची लक्षणं दिसून आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) मते, मानवांमध्ये मंकीपॉक्सची पहिली केस १९७० मध्ये नोंदवली गेली. त्यानंतर काँगोमध्ये राहणाऱ्या ९ वर्षांच्या मुलामध्ये हा संसर्ग आढळून आला. १९७० नंतर, ११ आफ्रिकन देशांमध्ये मानवांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची प्रकरणं नोंदवली गेली.

मंकीपॉक्सचा संसर्ग आफ्रिकेतून जगात पसरला आहे. २००३ मध्ये अमेरिकेत मंकीपॉक्सची प्रकरणं समोर आली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये, इस्रायल आणि यूकेमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणं नोंदवली गेली. मे २०१९ मध्ये, नायजेरियाला प्रवास करून परत आलेल्या लोकांमध्ये सिंगापूरमध्ये देखील मंकीपॉक्सची पुष्टी झाली.

मंकीपॉक्सची लक्षणं काय आहेत?

मंकीपॉक्स विषाणूचा उष्मायन कालावधी ६ ते १३ दिवसांचा असतो. कधीकधी तो ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकते. संसर्ग झाल्यानंतर लक्षणं दिसण्यासाठी किती दिवस लागले म्हणजे उष्मायन कालावधी. ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणं आणि थकवा यांसारखी लक्षणं संसर्ग झाल्यानंतर पाच दिवसांत दिसून येतात. चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक सारखा हा आजार सुरुवातीला दिसतो. तीन दिवसांपर्यंत सतत तताप आल्यावर त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. शरीरावर पिंपल्स दिसतात. हात, पाय, तळवे आणि चेहऱ्यावर लहान पुरळ दिसतात. हे मुरुम जखमांसारखे दिसतात. शरीरावर निर्माण होणाऱ्या या मुरुमांची संख्या हजारोपर्यंत असू शकते. संसर्ग गंभीर झाल्यास, त्वचा सैल होईपर्यंत हे पुरळ बरे होत नाहीत.

Leave a comment