

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा (SL vs BAN) 5 गडी राखून पराभव करत विजयाने सुरुवात केली. कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. श्रीलंकेच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ 42.4 षटकांत 164 धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेसमोर विजयासाठी 165 धावांचे माफक लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने 39 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा करून विजयाची नोंद केली. अशाप्रकारे श्रीलंकेने वनडेमध्ये सलग 11वा विजय नोंदवला आहे.
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या उसळत्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना (32 धावांत 4 विकेट) आणि ऑफस्पिनर महीष थिक्षणा (19 धावांत 2 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ 42.4 षटकांत गडगडला. नझमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकानंतरही श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव 164 धावांत गुंडाळला. नझमुल हुसेन शांतोने 122 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 89 धावा केल्या, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून पुरेशी साथ मिळाली नाही. त्याने तौहीद हृदय (20) सोबत चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारीही केली.
हेही वाचा – BCCI Media Rights : शेवटी अंबानीच..! बीसीसीआय झालं मालामाल, नक्की वाचा!
प्रत्त्युत्तरात बांगलादेशने शानदार गोलंदाजी करत अवघ्या 43 धावांत श्रीलंकेचे 3 गडी बाद केले होते. त्यावेळी सामन्यात निकराची लढत होईल, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. सदीरा समरविक्रमाने 77 चेंडूत 54 धावा आणि चरित अस्लंकाने 92 चेंडूत 62 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे श्रीलंकेने 2023 च्या आशिया चषकाची सुरुवात विजयाने केली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!