“देशाचं नाव बदला आणि…”, क्रिकेटर मोहम्मद शमीच्या बायकोचं पंतप्रधान मोदींना आवाहन!

WhatsApp Group

Hasin Jahan on INDIA : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघापासून दूर आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२२ मध्येही त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याचवेळी नेहमीच चर्चेत राहणारी शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीन जहाँनं क्रिकेटर शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते, तेव्हापासून ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिचं चर्चेत येण्याचे कारण पूर्णपणे वेगळं आहे.

देशाचं नाव बदलण्याचं आवाहन

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास आवाहन केलं आहे. तिनं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तिला ‘इंडिया’ (INDIA) या नावात बदल हवा आहे. हसीन जहाँनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हे आवाहन केलं आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ”आमचा देश, आमचा आदर. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. त्याचं नाव भारत किंवा हिंदुस्थान असावं. आपले माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री यांना ‘इंडिया’ हे नाव बदलण्याचं आवाहन आहे. जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान म्हणेल.”

हेही वाचा – Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान मॅचची तिकीटं कधी आणि कशी मिळणार? इथं वाचा!

या कॅप्शनसह हसीन जहाँनं एक डान्स व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दोन टीममेट्ससोबत देशभक्तीपर गाण्यावर डान्स करत आहे. पेशानं मॉडेल असलेली हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेळोवेळी अनेक फोटो, रील व्हिडिओ पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर ब्लू टिक असलेल्या हसीनचे लाखो फॉलोअर्स आहेत.

हसीन जहाँचे शमीवर आरोप!

तुम्हाला आठवत असेल की हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी २०१८ मध्ये झालेल्या वादापासून वेगळे राहत आहेत. हसीन जहाँनं शमीवर मारहाण, घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांनाही एक मुलगी आहे, जिच्यासाठी अलीकडेच शमीने गिफ्ट पाठवलं, तेव्हा हसीननं या गिफ्टला १०० रुपये किमतीची रोडवरची वस्तू म्हटलं होतं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment