

Redetaka To Vareri Road Funding : एकीचं बळ किती शक्तीशाली असतं, याचा प्रत्यय देवगडमधील एका आंदोलनामुळं सर्वांसमोर आला आहे. कोकण म्हटलं की सर्वांच्या समोर एक मनमोहक निसर्गसौंदर्य देखणं रुप उभं राहतं, पण या रुपाला नजर लागली, ती काही ठिकाणी असणाऱ्या घाणेरड्या रस्त्यांची. पर्यटक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात येतात, पण रस्त्यांची दुर्दशा पाहून त्यांचा भ्रमनिरास होतो आणि आपलं एक मत तयार करतात. आता या विचारांवर एक प्रक्रिया सुरू झाली असून, स्थानिकांनीच या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरवलं आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हा तालुका आहे. या तालुक्यामधील एका रस्त्याला पुन्हा जीवदान मिळण्याची शक्यता समोर आली आहे.
देवगड तालुक्यातील रेडेटाका ते वरेरी या रस्त्याच्या नूतनीकरण पावणाई सरपंच लाड यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. परंतु याप्रकरणी काही समोरून म्हणावी तशी योग्य प्रतिक्रिया येत नव्हती. ठोस कार्यवाही होत नाही, असं लक्षात आल्यावर ११ डिसेंबर २०२१ ला याच रस्त्यावर बापर्डे, वानिवडे, पावणाई, रहाटेश्वर, गढीताम्हणे या पाच गावांच्या सरपंचांनी लाड यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केलं होतं. या उपोषणाची आमदार नितेश राणे यांनी दखल घेऊन संबंधित विभागाला सूचना आणि पत्रव्यवहार करून ताबडतोब मंजुरीसाठी पाठविण्यास सांगितलं होतं.
हेही वाचा – होय महाराजा! पंतप्रधानांनी घेतली कोकणातील ‘बापर्डे’ ग्रामपंचायतीची दखल; देशपातळीवर झळकणार गाव!
आता या गोष्टीचा परिणाम म्हणून पुरवणी अर्थसंकल्प २०२१-२२ अंतर्गत या रस्त्याला सुमारे ४ कोटी २० लाख इतका निधी मंजूर झाला आहे. पाच गावचे पाच सरपंच (प्राची घाडी, कल्पना कदम,सुहासनी कदम,पप्पू लाड आणि संजय लाड) यांची मेहनत फळाला आली आहे. ग्रामस्थांनीही या निधीबाबत समाधान व्यक्त करून आमदार राणे यांचे आभार मानले. रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला. प्रत्येक वर्षीचा जोरदार पाऊस आणि त्यात वाईट पद्धतीचं काम, असं मत या रस्त्याबाबत स्थानिकांनी व्यक्त केलं होतं. आता फक्त खड्डे बुजवणं काम न होता, नवीनच रस्ताकाम होईल, या आशेवरच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.