पत्रकारांचा पॉईंट : सगळं कळतंय पण सांगता न येणारी..! गावातून शहरात आलेल्यांची गोष्ट

WhatsApp Group

गेल्या आठवड्यात सुटीच्या दिवशी घरी मी, अजिंक्य, अर्जुन आणि संतोष बसलेलो. मी विदर्भातला. अजिंक्य, अर्जुन मराठवाड्यातले, तर संतोषचा जन्म मुंबईतला आणि तो वाढला, जगलाही इथंच. सगळे सोपस्कार झाले. गप्पा सुरू झाल्या. घड्याळाचे काटे जसजसे धावायला लागले तसतसा गप्पांना अधिकच अर्थ येऊ लागला होता. मग आम्ही तिघे विरुद्ध संतोष अशी चर्चा सुरू झाली. आमचं म्हणणं की तुला किंवा शहरातील इतरांना वातावरण, मार्गदर्शन मिळतं. संधी मिळतात. त्यावर संतोषचं म्हणणं की, तुम्ही आता शहरात आलात. तुम्हाला हे सगळं कळतंय तर आता तुम्ही स्वत:साठी किती झटता? पहाट होईपर्यंत आम्ही यावरच बोलत, भांडत राहिलो.

आम्हा तिघांच्या तुलनेत संतोषला करिअरविषयी म्हणा किंवा एकूणच सगळ्या गोष्टी चटकन समजल्या. कारण त्याला पूरक वातावरण मिळालं. संतोष मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेजला शिकला. तेच सिद्धार्थ कॉलेज जे एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होतं. मुंबईतलं जीवन, इथला संघर्ष, कष्ट त्यानं जवळून अनुभवलं. आंबेडकर, दलित चळवळीसोबत त्याचा जवळून आणि अत्यंत कमी वयात संबंध आला. त्याला कला क्षेत्रात आवड आहे हे त्यानं खूप आधी ओळखलं आणि त्यानुसारचं मग पुढचं शिक्षण घेतलं आणि कामंही केलं. नाटक केलं, शॉर्टफिल्म्स केल्या, लिखाण केलं, कविता केल्या, माध्यमात काम केलं. सध्या संतोष फ्रीलान्सर आहे आणि घरूनच बऱ्यापैकी काम करून त्याचं व्यवस्थित सुरूये. याचा अर्थ संतोषला केवळ वातावरण मिळालं म्हणून तो सगळं करू शकला असा बिलकूल होत नाही. त्यामागे अर्थातच त्याची मेहनतही आहे. पण मेहनतीला संधी आणि वातावरणाची जोड होती.

हेही वाचा – ‘बिझनेस माइंडेड’ अभिनेते प्रदीप पटवर्धन आपल्याच नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचे?

याउलट मी, अजिंक्य आणि अर्जुनचं. वयाच्या तिशीत आलोय तरीही आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचंय, हा दररोज झोपताना पडणारा प्रश्न कायम आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे वातावरण आणि संधी. अजिंक्य मूळचा हिंगोलीचा, पण जन्म, लहानपण आणि जवानी औरंगाबादेत गेली. त्याला शहरी वातावरण लाभलं. नाही म्हटलं तरी त्याच्या घरात एक शैक्षणिक पार्श्वभूमी होती. त्यामुळे त्याला मोठं होताना शहरी जीवन दिसलं. शिक्षण घेऊन नोकरी मिळवायची असते किमान ही बेसिक लाईन कळली. त्यानुसार तो वाढला, शिकला आणि नोकरीला लागला. औरंगाबाद मोठं शहर आहे. तिथं दररोज काहीतरी घडत असतं. सांस्कृतिक चळवळीचा शहराला मोठा इतिहास आहे. नाटकं होतात. व्याख्यानाचे कार्यक्रम होतात. आंदोलनं होतात. जाहीर सभा होतात. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लहान वयापासून अशा गोष्टी त्याला पाहायला मिळाल्या. त्या लहान वयात आपसूकच मनाच्या एका कोपऱ्यात कायमच्या गोंदवल्या जातात. ते त्याच्यासोबत झालं. समाजकारण किंवा राजकारणाची पुसटशी समज किंवा तोंडओळख म्हणा त्याला झाली. कारण तिथलं वातावरण तसं होतं आणि तिथं तो वाढला, जगला.

ग्रामीण भागाविषयी मराठी साहित्यात फार सालस, निरागस लिखाण झालेलं आहे. पण मला नेहमी वाटतं ते एकांगी आहे. गाव तसं नाहीये जसं चित्रित केलं गेलंय, असं माझं मत आहे. बरं शहर आणि ग्रामीणमधील दरी आजची नाही.
अर्जुन बीडमधल्या एका छोट्याश्या खेड्यातला. त्याचा जन्म आणि सुरुवातीचे दिवस तिथंच गेले. आई-वडील शेतकरी. गावात किंवा आजूबाजूला कायम वावराच्या गप्पा. जसं सामान्य शेतकरी कुटुंबाचं आयुष्य असतं तेच याच्याही वाट्याला आलं. आपण भलं अन् आपलं काम भलं ही वृत्ती. अर्जुन मोठा होत असताना त्याला गाव हळूहळू समजत गेलं. गावात राजकारण असतं. भावकीमधले हेवेदावे असतात. राग असतो. द्वेषही असतो. स्पर्धा असते. वय वाढत असताना त्याचा मेंदू हे छोटेछोटे बदल टिपत असावा. शेती करणारे आणि राजकारण करणारे हे दोन्ही वर्ग गावात असतात. तुलनेनं शिक्षणाविषयी फार काही कोणी बोलत नाही. त्या विषयाचा गंधच नसल्यानं ते त्यावर बोलणार तरी काय. त्यामुळे रोज संध्याकाळी पाऱ्यावर रंगणाऱ्या गप्पांमध्ये शेती आणि शेतीसंबंधीत विषयच असतात. एखादा तालुक्याला चक्कर मारणारा कोणी असेल तर तो थोडंफार मतदारसंघातल्या राजकारणावर आभाळ हाणतो. एखादं म्हातारं न चुकता संपादकीय वाचणारं असेल तर ते मोदी कसा चुकतो आणि गांधींनी काँग्रेस वाचवण्यासाठी प्रियांकाला कसं प्रोजेक्ट करावं यावरही खपाखप बोलून जातं. बरं काही बोटावर मोजण्याइतकी मुलं शहरात जाऊन काही छोटीशी नोकरी करत असतील तर त्यांना नाव ठेवणाऱ्यांची संख्या मोठी. २० हजारात गुलामी करतंय ते त्यापेक्षा आपलं वावर काय वाईटं आहे का, हा अत्यंत बाणेदार युक्तीवाद केला जातो. सांगायचा मु्द्दा अर्जुननं त्याच्या सुरुवातीच्या आयुष्यात या गोष्टी ऐकल्या, पाह्यला आणि अनुभवल्या. दिवसभर शेतात काम करायचं, घरी आल्यावर पण शेतीविषयीच बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी परत शेतात. असा बहुतेकांचा कार्यक्रम. अशा वातावरणात अर्जुन वाढला. तर अशी ही कथा आहे. यात संतोष वगळता प्रत्येकानं आयुष्याच्या एका टप्प्यावर आपलं घरं सोडलंय. यातल्या प्रत्येकाची श्टोरी वेगळी आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. जगण्या-वागण्याचे सांस्कृतिक संदर्भ वेगळे आहेत. आम्हा सगळ्यांना लहानपणापासूनचं संचित घेऊनच पुढे जायचंय. ही काही चौघांची श्टोरी नाही. कमी-जास्त फरकानं प्रत्येकाच्या आयुष्यात असाच संघर्ष आहे. समाजाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाच्या गुणवत्तेला एका योग्य संधीची गरज असते. ती एक संधी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला मिळावी. आपण समाज म्हणून ती संधी प्रत्येकाला द्यावी. प्रत्येकामधलं अस्सल बाहेर काढण्यासाठी आणि एक सक्षम समाज निर्माण करण्यासाठी आपण इतकं तरी करूच शकतो.

-श्रीकांत घुले, पत्रकार (श्रीकांत घुले यांच्या फेसबुकवरून साभार)

Leave a comment