Adani Group Defamation Journalist Ravi Nair Case : अदानी समूहाशी संबंधित मानहानी प्रकरणात स्वतंत्र पत्रकार रवी नायर यांना दोषी ठरवत न्यायालयाने एक वर्षांची साधी कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील मानसा येथील दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला.
ही कारवाई अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने सप्टेंबर 2021 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीवर आधारित होती. कंपनीच्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर 2020 ते जुलै 2021 या कालावधीत रवी नायर यांनी त्यांच्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावर तसेच ‘adaniwatch.org’ या संकेतस्थळावर अदानी समूहाविरोधात अनेक पोस्ट आणि लेख प्रसिद्ध केले होते.
या पोस्टमध्ये अदानी समूहावर भ्रष्टाचार, सत्ताधारी व्यवस्थेशी संगनमत, पर्यावरणीय कायद्यांमध्ये हस्तक्षेप, शासकीय संस्थांचा गैरवापर आणि अनैतिक व्यावसायिक पद्धती यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले होते.
कंपनीचा दावा काय?
अदानी एंटरप्रायझेसने न्यायालयात मांडले की हे सर्व आरोप निराधार आणि अप्रमाणित असून, ते अशा पद्धतीने मांडले गेले की गुंतवणूकदार, नियामक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये कंपनीची प्रतिमा मलिन होईल. कंपनीने स्पष्ट केले की ती कठोर नियमावली असलेल्या क्षेत्रांत कार्यरत असून, अशा प्रकारचे आरोप थेट तिच्या विश्वासार्हतेवर परिणाम करतात.
पत्रकारांची बाजू
रवी नायर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत न्यायालयात सांगितले की त्यांच्या पोस्ट या जनहिताच्या मुद्द्यांवर आधारित पत्रकारितेचा भाग होत्या. त्यांनी नमूद केले की सर्व माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित होती आणि ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या चौकटीत येते. त्यांनी या प्रकरणाला मानहानी नव्हे, तर निष्पक्ष टीका असे संबोधले.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने मात्र नमूद केले की पत्रकार म्हणून डिजिटल माध्यमांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना पुराव्यांची जबाबदारी अधिक असते. आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने त्यांना एक वर्षांची साधी कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, प्रोबेशनचा लाभ देण्यासही न्यायालयाने नकार दिला.
निर्णयानंतर रवी नायर यांच्या अधिकृत खात्यावर सुप्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या ‘हम देखेंगे’ या कवितेतील ओळी पोस्ट करण्यात आल्या.
रवी नायर कोण आहेत?
उपलब्ध माहितीनुसार, रवी नायर हे स्वतंत्र पत्रकार असून ते देश-विदेशातील विविध माध्यमसंस्थांसाठी लेखन करतात. ते ‘ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेशी संबंधित आहेत. ही संस्था संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांची तपासणी करणाऱ्या पत्रकारांचे जागतिक जाळे म्हणून ओळखली जाते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा