SMS वाचताच चोरानं परत केला पळवलेला माल; काय होता तो मेसेज?

WhatsApp Group

मुंबई : दरवाज्यासमोर लावलेल्या कॅमेऱ्यात चोरी पकडली गेली. चोरट्याला मेसेज (SMS) पाठवण्यात आला. चोरीचा माल परत न केल्यास बोटं कापली जातील, असं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. हा मेसेज वाचून चोराचं अवसानच गळालं. तो कमालीचा घाबरला होता. त्यानंतर त्या चोरानं माल शिस्तीत परत केला. ही घटना ब्रिस्टल (यूके) येथील आहे. ली सरकोझी असं चोराचं नाव आहे. सरकोझीला हा मेसेज आल्यावर तो चांगलाच घाबरला. त्यानंतर त्यानं दंडासह चोरीचा माल मूळ मालकाला परत केला.

खरं तर, चोर सरकोझीनं घराबाहेर अॅमेझॉन पार्सल पाहिलं होतं. या पार्सलमध्ये १५०० रुपये किमतीचा पंखा होता. जो तो चोरून पळून गेला. पण जेव्हा या पार्सलच्या मालकानं घरी पोहोचून सीसीटीव्ही तपासला, तेव्हा त्यानं हे फुटेज सोशल मीडियावर शेअर केले. हे फुटेज मालकाच्या एका नातेवाईकानेही पाहिलं होतं, ज्यानं चोर सरकोझीला ओळखलं.

काय होता मेसेज?

मेसेजमध्ये या नातेवाईकानं लिहिलं, ”म्हणजे तू तोच उंदीर आहे, जो लोकांचं पार्सल चोरत होता. मी १० मिनिटांत तुझं नाव, पत्ता शोधून काढेन. मी जेवढे पार्सल चोरले आहेत, त्यानुसार मी तुझी बोट कापून टाकीन. लवकरच भेटू.”

सरकोझीची कबुली!

सरकोझीला हा मेसेज मिळाल्यावर तो घाबरला. त्यानं मेसेजला उत्तर देताना लिहिलं, ”मला माफ करा, चोरीच्या पार्सलसह मी ४८०० रुपये वेगळे देईन.” यानंतर सरकोझीनं पंखा आणि पैशांसह सामान संबंधित मालकाला परत केले. त्यानंतर पोलिसांनी सरकोझीला अटक केली. चौकशीत त्याने हे पार्सल चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचा – ‘असं’ नाक असेल तर तुम्ही हुशार..! जाणून घ्या नाकाच्या आकारावरून तुमचं व्यक्तिमत्त्व

सरकोझी २६ जुलै रोजी ब्रिस्टल क्राउन कोर्टात हजर झाला, जिथे त्याला न्यायाधीश मार्क हार्टन यांनी २ वर्षे आणि ५ महिन्यांची शिक्षा सुनावली. फिर्यादीचे वकील केनेथ बेल यांनी कोर्टात तो मेसेजही दाखवला ज्यामध्ये सरकोझीनं माफी मागितली होती. बेल यांनी सांगितले, की सरकोझीनं २००० आणि २०१२ मध्ये चोरी केली होती. त्यानं हे तीन वेळा केलं आहे, या प्रकरणात त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हायला हवी. बचाव पक्षाचे वकील मॅथ्यू कमर यांनी सरकोझीची तुरुंगवासाची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली. मात्र, सरकोझीनं परत केलेले पैसे आणि फॅन पार्सल धर्मादाय संस्थेला दान करण्यात आलं आहे.

Leave a comment