

मुंबई : फेसबुकचा सह-संस्थापक मार्क झुकरबर्गनं सॅन फ्रान्सिस्कोमधील आपले आलिशान घर विकलं आहे. झुकरबर्गनं २०१२ मध्ये खरेदी केलेले हे घर विकून तिप्पट नफा कमावला आहे. सात हजार स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त जागेत बांधलेलं हे घर झुकरबर्गनं ३१ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे २५० कोटी रुपयांना विकले आहे. झुकरबर्गनं नोव्हेंबर २१२ मध्ये हे घर १० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ८० कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याच्याकडं सिलिकॉन व्हॅली, लेक टाहो आणि हवाई येथे इतर अनेक लक्झरी घरं आहेत.
झुकरबर्गनं हे घर विकून यावर्षी सॅन फ्रान्सिस्कोमधील सर्वात महागडे घर विकण्याचा विक्रमही केला आहे. हे घर मिशन डिस्ट्रिक्ट आणि झुकरबर्ग सॅन फ्रान्सिस्को जनरल हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरला लागून आहे. हे घर १९२८ मध्ये बांधण्यात आलं होतं. फेसबुकच्या आयपीओनंतर काही वेळातच झुकरबर्गनं हे घर विकत घेतलं. २०१३ मध्ये झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅन यांनी या घराला नवा लुक देण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले. त्यात लॉन्ड्री रूम, वाईन रूम, वेट बार, ग्रीन हाऊस असे बदल करण्यात आले.
झुकरबर्गची इतर घरं!
झुकरबर्गकडं सिलिकॉन व्हॅली, लेक टाहो आणि हवाई येथे इतर अनेक लक्झरी घरं आहेत. कॅलिफोर्निया आणि नेवाडा सीमेवर पसरलेले लेक टाहो हे मार्क झुकरबर्गच्या शेजारी अनेक सेलिब्रिटींचं घर आहे. झुकेरबर्गचं कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे ५,६१७ स्क्वेअर फूट पसरलेलं घर आहे. आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, त्यांनी लग्नाच्या एक वर्ष आधी २०११ मध्ये सात मिलियन डॉलर्सला घर विकत घेतलं होतं.
झुकरबर्गची संपत्ती..
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती ६१.९ बिलियन डॉलर्स आहे. २०२२ मध्ये झुकरबर्गच्या संपत्तीत आतापर्यंत सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. याचं कारण म्हणजे या वर्षी आयटी शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण, याचा परिणाम फेसबुक आणि त्याची मूळ कंपनी मेटालाही झाला आहे. २६ जुलैपर्यंत झुकरबर्गनं या वर्षात आतापर्यंत ६३.५ बिलियन किंवा निम्म्याहून अधिक संपत्ती गमावली आहे. नेटवर्थमध्ये घट झाल्यामुळे एकेकाळी जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेला झुकरबर्ग आता १७व्या क्रमांकावर घसरला आहे.
फेसबूक कसं सुरू झालं?
हार्वर्ड विद्यापीठात शिकलेल्या झुकरबर्गनं सुरुवातीपासूनच कॉम्प्युटर प्रोग्रामिंग क्षेत्रात प्रभुत्व मिळवलं. २००३ मध्ये त्यानं हार्वर्ड स्टुडंटचा डिरेक्टरी सर्व्हर हॅक केला आणि त्यातील सर्व प्रोफाईल एकत्र करून फेसमास नावाची नवीन साइट तयार केली. या साइटवर सुंदर दिसणाऱ्या मुलींचे फोटो टाकले जायचे आणि त्यांपैकी कोण अधिक आकर्षक आहे?, यासाठी मतदान व्हायचं. हॉवर्डच्या मॅनेजमेंटला ही गोष्ट त्यांनी तत्काळ वेबसाइट बंद केली. यानंतर २००४ वर्षाच्या सुरुवातीला, मार्क झुकरबर्ग यांनी तीन सहकाऱ्यांसोबत (ड्यूस्टिन मॉस्कोविट्झ, एडुआर्डो सेव्हरिन आणि ख्रिस ह्यूजेस) भागीदारीत फेसबुक सुरू केलं.