

मुंबई : फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आता चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. या नव्या कामगिरीसह त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या रिअल-टाइम रँकिंगनुसार (Forbes Real Time Billionaire List), बिल गेट्स यांची अंदाजे एकूण संपत्ती १०२ बिलियन डॉलर्स आहे आणि गौतम अदानी आणि कुटुंबाची एकूण संपत्ती ११४ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. बिल गेट्स यांनी गेल्या आठवड्यात गेट्स फाऊंडेशनला त्यांच्या संपत्तीतून २० बिलियन डॉलर्स दान दिलं. या देणगीनंतर बिल गेट्स यांच्या क्रमवारीत घसरण झाली आणि आता ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहेत. गेट्स यांच्या देणगीचा फायदा ६० वर्षीय गौतम अदानी यांना झाला.
अदानींचा व्यवसाय..
महत्त्वाचं म्हणजे २०२१ च्या सुरुवातीच्या तुलनेत भारतीय उद्योगपती अदानींच्या संपत्तीत दुपटीनं वाढ झाली आहे. आता ही संपत्ती ११२.९ बिलियन डॉलर्स झाली आहे. अदानी यांचा व्यवसाय बेसिक इन्फ्रा, वीजनिर्मिती, हरित गॅस, पोर्ट्स म्हणजेच बंदरापर्यंत पसरला आहे. अदानी यांना हरित ऊर्जेचं जगातील सर्वात मोठं उत्पादक बनायचं आहे आणि ते अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर ७० बिलियन डॉलर्स पर्यंत गुंतवणूक करणार आहेत. यासह, गौतम अदानी आता ११५.६ बिलियन डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
अंबानी कितव्या स्थानी?
भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी या शर्यतीत सातत्यानं मागं पडत आहेत. फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्सनुसार, अंबानी-अदानी यांच्यातील हे अंतर २६ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे. अंबानी यांची एकूण संपत्ती ८७ बिलियन डॉलर्स आहे. ते आता या यादीत दहाव्या स्थानी आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांची एकूण संपत्ती २३५.८ बिलियन डॉलर्स आहे. या यादीतील इतरांमध्ये लॅरी एलिसन, वॉरेन बफेट, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा समावेश आहे.
Mr. Gautam #Adani surpasses Bill Gates to become world's 4th richest person. It's just a matter of time when we'll see just Indians topping the list !
— Prafull MBA CHAI WALA (@Prafull_mbachai) July 16, 2022
इस्रायलमधील हैफा या महत्त्वाच्या बंदराच्या विकासासाठी अदानी समूहानं निविदा जिंकली. इस्रायलच्या तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरांपैकी हैफा हे सर्वात मोठं बंदर आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह अदानी डेटा नेटवर्क्सनेही आगामी 5G लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केलाय. अदानी समूहानंही स्पेक्ट्रमच्या शर्यतीत असल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात, गौतम अदानी यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कुटुंबानं सामाजिक कारणांसाठी ६०,००० कोटी रुपयांची देणगी देण्याचं वचन दिलं होतं. गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे शेअर्स 600 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामामुळं सरकारी योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे.