

मुंबई : कोरोना, मंकीपॉक्स आणि इबोला या व्हायरसमधून जग सावरतंय इतक्यात नव्या व्हायरसनं जगाला घाबरून सोडलं आहे. या व्हायरसचं नाव मारबर्ग (Marburg) आहे. आफ्रिकन देश घानामध्ये हा व्हायरस सापडला आहे. या व्हायरसनं संक्रमित दोन रुग्ण सापडले आहेत. घानानं म्हटलं आहे की त्यांच्या देशात घातक मारबर्ग व्हायरसची लक्षणं असलेले दोन रुग्ण आढळले आहेत. मारबर्ग विषाणू हा संसर्गजन्य रोग आहे. या विषाणूमुळंच इबोला होतो. या दोन्ही रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, भारतात मंकीपॉक्सच्या दुसऱ्या रुग्णाचीही माहिती समोर आली आहे. दोन्ही रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत.
घानाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता त्या नमुन्यांची पुन्हा सेनेगलमधील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली आहे, जिथं त्यांच्यामध्ये मारबर्ग व्हायरसची लागण झाल्याचं कळलं. घानाच्या आरोग्य अधिकार्यांचं म्हणणं आहे, की संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आल्यामुळे ९८ लोकांना क्वारंटाइ करण्यात आले आहे. अद्याप त्यापैकी कोणामध्ये संसर्गाची पुष्टी झालेली नाही. संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) देखील याची दखल घेतली आहे.
Ghana confirms its first outbreak of highly infectious Marburg virus https://t.co/VCGIyfyyfi pic.twitter.com/ISghDJUTGl
— Reuters (@Reuters) July 18, 2022
जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी घाना सरकारला सर्व शक्य मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. इतकंच नाही तर मारबर्ग व्हायरसची पुष्टी झाल्यानंतर घानानं दिलेल्या त्वरित प्रतिसादाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. डब्ल्यूएचओचे आफ्रिकेचे संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती म्हणाले, ”घानानं चांगलं काम केलं कारण त्वरित आणि निर्णायक कारवाई न करता मारबर्ग व्हायरस सहजपणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.”
या व्हायरसची लक्षणं काय?
या व्हायरसच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, स्नायू दुखणं, रक्ताच्या उलट्या आणि रक्तस्त्राव यांचा समावेश होतो. हा व्हायरस लवकर नियंत्रणात न आल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. आरोग्य अधिकारी लोकांना लेण्यांपासून दूर राहण्याचा इशारा देत आहेत आणि सर्व मांस उत्पादनं खाण्यापूर्वी पूर्णपणे शिजवून घ्या, असं सांगत आहेत.
Two people die from Marburg virus in Ghana pic.twitter.com/1jytiusSvZ
— Ghana Broadcasting Corporation (@thegbcghana) July 8, 2022
पश्चिम आफ्रिकेत मारबर्ग व्हायरस सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी गिनीमध्ये एक केस सापडली होती. परंतु, ही गोष्ट कळल्यानंतर पाच आठवड्यांनंतर, सप्टेंबरमध्ये, गिनी सरकारनं तो उद्रेक संपल्याची घोषणा केली. अंगोलामध्ये २००५ मध्ये मारबर्ग व्हायरसनं २०० हून अधिक लोकांचा बळी घेतला होता. ज्यानंतर डब्ल्यूएचओने याला मारबर्ग व्हायरसचा सर्वात प्राणघातक उद्रेक म्हटलं आहे. मारबर्गचा पहिला उद्रेक १९६७ मध्ये जर्मनीमध्ये झाला, जिथे सात लोक मरण पावले.