ऐकलं का..? पुढच्या वर्षीपासून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर होणार बंद!

WhatsApp Group

Johnson Baby Powder : जगभरातील लाखो महिलांनी त्यांच्या मुलांना जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर कधी ना कधी लावलीच असेल. एक काळ असा होता जेव्हा यूकेच्या या दिग्गज कंपनीची उत्पादनं लहान मुलांसाठी सुरक्षित मानली जात होती. या कंपनीची उत्पादनं भारतातही चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. पण पुढच्या वर्षात तुम्हाला या कंपनीची टॅल्क बेस्ड बेबी पावडर (J&J बेबी पावडर) बाजारात मिळणार नाही. जॉन्सन अँड जॉन्सननं २०२३ मध्ये जगभरात या पावडरची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं गुरुवारी ही माहिती दिली. टॅल्क-आधारित बेबी पावडरऐवजी कॉर्नस्टार्च-आधारित बेबी पावडर जगभरात विकणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. दोन वर्षांपूर्वी कंपनीनं अमेरिकेत या पावडरची विक्री बंद केली होती. अमेरिकेत हजारो ग्राहकांनी खटले दाखल केल्यानंतर कंपनीनं हा निर्णय घेतला.

कंपनीविरुद्ध ३८,००० खटले

कंपनीनं २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्क आधारित बेबी पावडरची विक्री बंद केली आहे. कंपनीवर ३८,००० हून अधिक खटले सुरू आहेत. अनेक महिलांनी दावा केला की त्यांना बेबी पावडर वापरल्यानंतर गर्भाशयाचा कर्करोग झाला. अमेरिकन नियामकांनी दावा केला की त्यांना कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक सापडले आहेत. मात्र, कंपनीनं हे आरोप फेटाळून लावले होते. कंपनीनं सांगितलं, की उत्तर अमेरिकेतील विक्री घटल्यामुळं त्यांनी ते उत्पादन काढून टाकलं आहे.

काय आहे ही पावडर?

कंपनीच्या बेबी पावडरमध्ये वापरलं जाणारं टॅल्क हे जगातील सर्वात मऊ मिनरल आहे. हे अनेक देशांमध्ये बनवलं जातं. प्लास्टिक, फार्मास्युटिकल्स आणि कागद अशा अनेक उद्योगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ही पावडर नॅपी रॅश आणि इतर प्रकारच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरली जाते. कधीकधी त्यात एस्बेस्टोस असतं, ज्यामुळं शरीरात कर्करोग होऊ शकतो.

हेही वाचा – महिन्याला ८० हजार पगार आणि काम दारु पिणं..! ‘ही’ कंपनी देतेय नोकरी; वाचा!

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं आपलं उत्पादन सुरक्षित नसल्याचा आरोप सातत्यानं फेटाळला आहे. कंपनीचं म्हणणं आहे, की अनेक दशकांच्या वैज्ञानिक चाचणी आणि नियामक मंजूरींनी त्यांचं टॅल्क सुरक्षित आणि एस्बेस्टोस मुक्त असल्याचं दर्शवलं आहे. गुरुवारी या उत्पादनाची विक्री बंद करण्याची घोषणा करतानाही कंपनीनं हीच गोष्ट पुन्हा सांगितली.

भारतातही उत्पादन बंद करावं लागलं

पावडरमध्ये एस्बेस्टोस असल्याच्या आरोपानंतर जॉन्सन अँड जॉन्सनला २०१९ मध्ये भारतातील त्यांच्या प्लांटमध्ये उत्पादन थांबवावं लागलं होतं. मात्र, ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला चाचणीत पावडरमध्ये एस्बेस्टोस आढळलं नाही. त्यानंतर, कंपनीनं आपल्या मुलुंड प्लांटमध्ये बेबी पावडरचं उत्पादन पुन्हा सुरू केलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment