

Sea Cucumber Cancer Cure : कर्करोगावर प्रभावी उपाय शोधणाऱ्या वैज्ञानिकांना आता समुद्राच्या तळाशी असलेला एक अजब जीव “समुद्री काकडी” (Sea Cucumber) नवी आशा देतोय. ‘ग्लायकोबायोलॉजी’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार, या समुद्री प्राण्यामध्ये आढळणारे एक दुर्मिळ साखरेचे संयुग (fucosylated chondroitin sulfate) कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत असलेल्या विशिष्ट एन्झाइमवर (Sulf-2) आघात करू शकते.
समुद्री काकडी – महासागराचा वैद्य
जगभरात 1000 हून अधिक जातींच्या समुद्री काकड्या सापडतात. ह्या प्राण्यांना ‘ओशन क्लिनर’ किंवा महासागराची झाडू अशीही उपमा दिली जाते, कारण ते समुद्राच्या तळाशी असलेला गाळ, सूक्ष्म शेवाळ आणि बॅक्टेरिया साफ करतात. पण शेवटच्या काही दशकांमध्ये त्यांचा अतोनात शिकार करण्यात आला असून त्यामुळे समुद्री परिसंस्था धोक्यात आली आहे.
कर्करोगाच्या वाढीला लगाम
फ्लोरिडा सी कुकुंबर (Holothuria floridana) या जातीच्या काकडीत सापडलेल्या संयुगाने Sulf-2 नावाच्या एन्झाइमवर परिणाम दाखवला आहे. हाच एन्झाइम यकृताचा कर्करोग (hepatocellular carcinoma), फुफ्फुस, स्तन आणि जठर कर्करोग यांच्याशी संबंधित आहे. या एन्झाइमचा परिणाम पेशींच्या बाह्य ‘ग्लायकॅन्स’ नावाच्या संरचनेवर होतो, ज्यामुळे पेशींची संवाद क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती बिघडते व कर्करोग झपाट्याने पसरतो.
हेही वाचा – हेअर डाय केवळ सौंदर्याचं साधन की कॅन्सरचं कारण? WHO काय म्हणतं, ‘हे’ माहीत नसल्यास पश्चात्ताप होईल!
याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपीच्या संशोधक मार्वा फर्राग म्हणतात, “समुद्री जीवांमध्ये असलेली संयुगे ही भूपृष्ठावर आढळणाऱ्या प्राण्यांपेक्षा खूप वेगळी असतात. म्हणूनच समुद्री काकडीतले संयुग महत्त्वाचं ठरतंय.”
औषध बनवताना अडथळा मात्र मोठा!
या संयुगाचे आणखी फायदे म्हणजे ते रक्त साकळण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणत नाही, तसेच त्यामध्ये कोणतेही विषाणू संक्रमित होण्याचा धोका नाही. परंतु एक समस्या ही आहे की, नैसर्गिकरीत्या या साखरेचे संयुग खूपच कमी प्रमाणात मिळते. यामुळे या प्राण्यांचा उपयोग औषधनिर्मितीसाठी थेट करता येत नाही.
प्रोफेसर विटोर पोमिन यांच्या मते, “आम्ही आता हे संयुग रासायनिक पद्धतीने निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून प्राण्यांवर प्रयोग करता येतील.”
टीप: ही माहिती वैद्यकीय सल्ला नसून केवळ माहितीपुरती आहे. कृपया कोणताही उपचार सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा