WhatsApp वापरणाऱ्यांसाठी खुशखबर..! येतायत तीन ‘नवीन’ फीचर्स; तुम्हाला माहितीयेत का?

WhatsApp Group

WhatsApp New Features : गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲप (WhatsApp)च्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं, कोट्यवधी लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात दररोज संवाद साधत आहेत. मात्र, या प्लॅटफॉर्मवर प्रायव्हसीबाबत वाद निर्माण झाले असून व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मवरून यूजर्सचा डेटा लीक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग ऍप्लिकेशन्सच्या वाढीचं सर्वात मोठे कारण म्हणजे व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीबाबत असलेला संभ्रम. मात्र, आता व्हॉट्सॲपही प्रायव्हसीबाबत नवीन उपाययोजना करणार आहे.

मेटा सीईओ मार्क झुकरबर्गनं अलीकडंच घोषणा केली, की व्हॉट्सॲप आपल्या यूजरसाठी तीन नवीन फीचर आणणार आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपनं प्रायव्हसी धोरणामध्ये एक नवीन स्तर जोडण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून युजर्सना त्यांच्या मेसेजेसबद्दल सुरक्षितता वाटेल. या तीन फीचर्सच्या मदतीनं तुम्ही तुमचं ऑनलाइन स्टेटस लपवू शकत नाही तर हे फीचर युजर्सना मेसेजिंग दरम्यान सुरक्षेवर अधिक नियंत्रण देईल. याशिवाय, या फीचर्सच्या मदतीनं यूजर्स त्यांना हवं असल्यास शांतपणे ग्रुप सोडू शकतात आणि ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना याची माहितीही नसणार आहे.

गुपचुप ग्रुप सोडता येणार!

व्हॉट्सअ‍ॅपवर कुटुंब, मित्र आणि इतर अनेक व्यावसायिक ग्रुप बनलेले असतात आणि अनेक कारणांमुळे लोक या ग्रुपमधून बाहेर पडू शकत नाहीत असं अनेकदा दिसून येतं. कौटुंबिक ग्रुप सोडताना नातेवाईकांचा राग येण्याचा धोका आहे. ग्रुप सोडताना मित्र त्रासदायक ठरू शकतात आणि व्यावसायिक ग्रुप सोडल्यास बॉसही नाराज होऊ शकतो. परंतु आजच्या डिजिटल शर्यतीत, लोकांना व्हॉट्सअॅपच्या मेसेज नोटिफिकेशनमुळं खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्समुळं युजर्सना मोठा दिलासा मिळू शकतो. या नवीन फीचरनुसार यूजर्स आता कोणताही ग्रुप सोडू शकतात आणि ग्रुपमधील बाकीच्या लोकांना याची माहितीही असणार नाही. याची माहिती फक्त ग्रुपच्या अॅडमिनला दिली जाईल. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर या महिन्यात सर्व व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आणले जाऊ शकते.

हेही वाचा – Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टेटस

बर्‍याच वेळा असं होतं की युजर्सना त्यांचं ऑनलाइन स्टेटस काही लोकांसमोर दाखवायचं नसतं. तथापि, आत्तापर्यंत पर्याय असा होता की तुम्ही एकतर तुमच्या सर्व संपर्कांसाठी ऑफलाइन व्हा किंवा प्रत्येकासाठी ऑनलाइन दिसाल. पण या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सअॅप युजर्सना कोणासाठी ऑनलाइन व्हायचे आहे आणि कोणासाठी ऑफलाइन स्टेटस दाखवायचे आहे, यासाठी ही सुविधा देणार आहे.

स्क्रीनशॉट ब्लॉक होणार!

व्हॉट्सअॅपमध्ये एक खास फीचर आहे जे यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप व्ह्यू वन्स असं या फीचरचे नाव आहे. या फीचरनुसार, लोक कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्डशिवाय फोटो किंवा मीडिया शेअर करू शकतात आणि मेसेज एकदाच पाहता येणार आहे. आता व्हॉट्सअॅप या फीचरमध्ये सुरक्षेचा आणखी एक स्तर आणणार आहे. आता या अपडेट केलेल्या फीचरनुसार, लोक फोटो एकदा पाहू शकतात परंतु या फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत. स्क्रीनशॉट ब्लॉक करणाऱ्या या फीचरची चाचणी केली जात आहे.

Leave a comment