५८ कोटी कॅश, ३२ किलो सोनं…; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात सापडलं ३९० कोटींचं घबाड! आयकर विभागाची कारवाई

WhatsApp Group

Jalna Income Tax Raid : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात आयकर विभागानं स्टील, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापे टाकले असून, त्यामध्ये आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने सापडले आहेत. प्राप्तिकर विभागानं सुमारे ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यात ५८ कोटी रोख, ३२ किलो सोने, हिरे आणि मोती आणि अनेक मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले त्यांची नावं पीटी स्टील्स प्रा. लि. आणि कालिका स्टील अलॉयज प्रा. लिमिटेड अशी सांगितली जात आहेत.

रोकड मोजण्यासाठी लागले १३ तास

छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी विभागाला १३ तास लागले. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई १ ते ८ ऑगस्ट दरम्यान झाली आहे. आयकर विभागाच्या नाशिक शाखेनं ही कारवाई केली. या कारवाईत राज्यभरातील २६० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

१२० वाहनं वापरली

या संपूर्ण छाप्यात १२० हून अधिक वाहनांचा वापर करण्यात आला. प्राप्तिकर विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची पाच टीममध्ये विभागणी करण्यात आली होती. सापडलेली रोकड स्थानिक स्टेट बँकेत जालना नेऊन मोजण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली रोख मोजणी दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होती. जालन्यातील चार स्टील कंपन्यांच्या वर्तनात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर विभाग कारवाईत आला. विभागाने घर आणि कारखान्यावर छापे टाकले.

हेही वाचा – भारीच..! २४ वर्षाच्या पोरासोबत ४२ वर्षाच्या आईनंही मिळवली सरकारी नोकरी; नक्की वाचा!

गेल्या चार-पाच दिवसांपासून हा छापा गुप्तपणे सुरू असल्याची माहिती आयटी सूत्रांनी दिली. ज्या दोन स्टील कंपन्यांवर छापे टाकण्यात आले त्यांची नावं कालिका स्टील आणि साई राम स्टील अशी सांगण्यात येत आहेत. ज्यामध्ये कालिका स्टीलच्या मालकाचे नाव घनश्याम गोयल असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण ऑपरेशन अत्यंत शांततेत पार पडलं. या कारवाईत आयकर विभागानं स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली.

‘दुल्हन हम ले जाएंगे’चे स्टिकर्सचा वापर

छापे मारताना आयकर अधिकाऱ्यांनी चांगलीच काळजी घेतली. हा छापा व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निदर्शनास आला नाही, यासाठी प्राप्तिकर दल अत्यंत सतर्क होते. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईतील अधिकारी त्यांच्या वाहनांवर वधू-वरांच्या नावाचे स्टिकर्स लावले. याद्वारे ही वाहनं मिरवणुकीचा भाग असून लग्नाला जात असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘दुल्हन हम ले जायेंगे’चे वेगवेगळे स्टिकर्स वाहनांवर लावण्यात आले होते, जो अधिकाऱ्यांसाठी कोड शब्द होता.

हेही वाचा – Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अंकिता मुखर्जी यांच्या दोन घरांवर अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) छापे टाकले, ज्यात ईडीनं ५० कोटी रुपये जप्त केले. पश्चिम बंगाल एसएससी घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये छापे टाकल्यानंतर देशभरात छापेमारीची फेरी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला होता.

Leave a comment