Measles Outbreak in Mumbai : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.
ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.
हेही वाचा – मुंबईत गोवरचा उद्रेक..! ७४० मुलांमध्ये लक्षणं; तिघांचा…
गोवरपासून बचाव करण्यासाठी तुम्ही ही खबरदारी घ्यावी –
गोवर संसर्ग झाल्यास, रुग्णाला प्रथम इतर लोकांपासून वेगळे केले पाहिजे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. गोवर झाल्यास रुग्णाला पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. या आजाराच्या उपचारासाठी कोणतेही विशिष्ट औषध नसल्याने रुग्णाला लक्षणांच्या आधारे औषधे दिली जातात.
शरीरातील डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि द्रव पेयांचे सेवन करा. सूप, ज्यूस आणि हर्बल टी इत्यादींचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. गोवर टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे गोवरचा धोका वाढतो. गोवर टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापरही खूप फायदेशीर आहे. हे खाज कमी करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्याने फायदा होतो. गोवरच्या रुग्णाने नारळपाणी सेवन करावे. याचे सेवन शरीराला पाण्याच्या कमतरतेपासून वाचवण्याचे काम करते आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.