

Vinayak Mete Death : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाला आता एक नवी दिशा मिळाली आहे. या प्रकरणी कारचालक एकनाथ कदम विरोधात रसायनी (जि. रायगड) पोलिस ठाण्यात कलम ३०४अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. सीआयडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अतिशय भीषण असा अपघाती मृत्यू झाला होता.या घटनेनंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून सीआयडीकडून या प्रकरणी तपास करण्यात येत होता.
‘सीआयडी’ चौकशी झाली
विनायक मेटे यांच्या गाडीचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेत मेटेंचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीची घोषणा केली. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सीआयडी चौकशी करून अहवाल सादर केलाय. एकनाथ कदमला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. सीआयडीच्या चौकशीत त्याच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.
हेही वाचा – शिक्षकांचा मार खाल्लाय? दाढी का ठेवता? मुलांच्या प्रश्नांना…
फुटेजमध्ये आले समोर
विनायक मेटेंच्या अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. त्यानुसार कारचालक एकनाथ कदम ताशी १२० ते १४० किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे समोर आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. अपघातापूर्वी कदमने एकदम उजवे वळण घेत ओव्हरटेकचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
गाडीचा वेग, घेतलेला टर्न पाहता चालकाला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित होते. तरीही त्याने ओव्हरटेक केला. त्यामुळे डाव्या बाजूला अपघात झाला. खरे तर हा ओव्हरटेक केलाच नसता, तर कदाचित अपघात टळला असता. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळेच सीआयडीकडून कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा –
मुख्यमंत्री शिंदेंनी दिले होते चौकशीचे आदेश
विनायक मेटे यांच्या अपघातानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. यानंतर मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल, असं जाहीर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं. या अपघात आणि मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले होते.