लोकांचा लोकनाथ, अनाथांचा एकनाथ..! ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ म्हणून शिंदेंना का ओळखलं जातं?

WhatsApp Group

मुंबई : एकनाथ कुठंय? धर्मवीर चित्रपटातील ‘आनंद दिघें’च्या तोंडचं वाक्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं आपण पाहिलं. अनेकांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला हा सीन ठेवला. त्याला कारण ठरलं कट्टर शिवसेना नेते एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असण्याचं. विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत आलबेल नसल्याचं समोर येताच एकनाथ शिंदेसह १३ आमदार संपर्काबाहेर झाले. शिंदेच्या फोनवर कॉल केला असता, त्यांची टोन गुजराती भाषेत ऐकू आल्यानंतर ते सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं कळलं. राज्याचं सरकार कोसळणार, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, अशी चर्चा जनमानसात असताना एकनाथ शिंदे हेच नाव दिवसभर ‘ट्रेंड’ होत राहिलं. सेनेचा बडा नेता आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ख्याती असणारे एकनाथ शिंदे नेमके कोण?

सुपरवायझर ते राजकारणी…

थंड हवेचं ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर हे एकनाथ शिंदेंचं गाव. गरीब कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंनी फार कमी वयात एका कंपनीत सुपरवायझरची नोकरी हाती घेतली. पैसा पुरत नसल्यामुळं त्यांनी ठाण्यात रिक्षाही चालवली. वयाच्या १८व्या वर्षी सेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ठाण्याला आपली कर्मभूमी बनवली. पक्षाचा जुना कार्यकर्ता आजही लक्षात राहतो, असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं त्यातीलच एक शिंदे होते. आनंद दिघेंच्या इच्छेमुळं शिंदेनी किसन नगरचं शाखाप्रमुखपद हाती घेत, ठाण्यात अनेकांच्या समस्या सोडवल्या.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमांदोलनात शिंदेची भूमिका प्रखर होती. या आंदोलनासोबत त्यांनी अनेक मोर्चे काढत आपली निष्ठा सिद्ध केली. १९९७ मध्ये दिघेंनी त्यांना ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत उभं केलं आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर लोकांनी त्यांना निवडून दिलं. २००४ पासून सलग चौथ्यांदा शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत गेले. विशेष म्हणजे २००४ मध्ये सेनेना मोठा पराभव झाला होता. २०१४च्या निवडणूकीत शिंदेंनी मोदी लाटेचा इफेक्ट आपल्यावर जाणवू न देता ठाण्यात शिवसेना टिकवली. दिघेंनंतर ठाण्यात पक्ष टिकवण्याचं जबरदस्त काम शिंदेनी चोख पद्धतीनं केलं. संयमी स्वभाव, पक्षासाठी काहीही करण्याची तयारी, लोकांचा प्रतिनिधी अशी ओळख आजतागायत शिंदेनी जपली.

वयाच्या ५६व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण करून डिग्री हातात घेणारे शिंदे राज्यातील एकमेव मंत्री आहेत. फक्त पास न होता, त्यांनी पदवी परिक्षेत ७७.२५ टक्के गुण मिळवलेत. गरिबीमुळं शिंदेंना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं. आयुष्यात यशस्वी होऊनही अशिक्षित असल्याचा ठप्पा लागू नये, याची काळजीही शिंदेंनी घेतली.

‘ती’ कटू घटना…

एकनाथ शिंदें आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या आयुष्यात एक खोलवर जखम आहे. खासदार आणि डॉक्टर असणाऱ्या श्रीकांत शिंदेंपूर्वी एकनाथ-लता यांना दिपेश आणि शुभदा अशी दोन मुलं होती. लहान असताना दिपेश-शुभदा यांचा एका अपघातात मृत्यू झाला. धर्मवीर चित्रपटातही हा दु:खद प्रसंग दाखवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर शिंदे दु:खात बुडाले होते. मात्र आनंद दिघे यांनीच मोठा आधार देत त्यांना प्रसंगातून बाहेर काढलं.

Leave a comment