IPL 2023 : नाकातलं बोट तोंडात..! अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ व्हायरल; पण नक्की खरं काय?

WhatsApp Group

IPL 2023 Arjun Tendulkar Viral Video : आयपीएल 2023 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 26 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यात सामना खेळला गेला. यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा 55 धावांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर एक घाणेरडे कृत्य करताना दिसत असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही विचित्र वाटेल आणि अर्जुन असे कसे करू शकतो, असा प्रश्नही पडेल.

अर्जुनचा हा व्हिडिओ खरा की खोटा?

या व्हिडिओत अर्जुन नाकात बोट घालताना दिसत आहे. त्याने आधी आपले नख चावले आणि नंतर तेच नख नाकात घातले. त्याचा हा प्रकार कॅमेरामनने आपल्या व्हिडिओत कैद केला. पण अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर रिव्हर्स करून मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आणि चाहत्यांनी त्याची प्रचंड खिल्ली उडवली. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अर्जुनने नाकात घातलेले बोट तोंडात घातले, असे दर्शवण्यात येत आहे.

हेही वाचा – IPL 2023 : चेसमास्टर फेल..! कोलकाताचा बंगळुरूवर 21 धावांनी विजय; चक्रवर्ती ठरला हिरो!

विशेष म्हणजे अर्जुन त्याच्या आयपीएल पदार्पणापासूनच प्रकाशझोतात आहे आणि जेव्हा त्याने त्याच्या दुसऱ्या सामन्यात करिअरची पहिली विकेट घेतली तेव्हापासून तो इंटरनेटवर चर्चेत आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात पाच धावा दिल्या. मात्र, पुढच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी त्याला एकाच षटकात 31 धावा चोपल्या. गुजरातविरुद्ध त्याने एक विकेट घेतली.

मुंबईचा मोठा पराभव

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावा केल्या. शुबमन गिलने 34 चेंडूत 56 धावा केल्या. त्यानंतर डेव्हिड मिलरने 22 चेंडूत 46 आणि अभिनव मनोहरने 21 चेंडूत 42 धावा केल्या. राहुल तेवतियानेही शानदार कॅमिओ खेळला कारण त्याने पाच चेंडूत तीन षटकारांसह 20 धावा केल्या. एमआयसाठी पियुष चावलाने दोन तर इतर चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याने 8 चेंडूत 2 धावा केल्या आणि तो हार्दिक पंड्याचा बळी ठरला. यानंतर इशान किशन 13 आणि कॅमेरून ग्रीन 33 धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार यादवने संघासाठी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो 23 धावांवर नूर अहमदचा बळी पडला. नेहल वढेराने संघासाठी 21 चेंडूत केवळ 40 धावांची खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. मुंबईने 20 षटकात 9 गडी गमावून अवघ्या 152 धावा केल्या आणि गुजरातने 55 धावांनी सामना जिंकला. गुजरातकडून नूर अहमदने 3, राशिद खान आणि मोहित शर्माने 2-2 आणि हार्दिक पंड्याने 1 बळी घेतला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment