PKL चा ‘कोहिनूर’ ठरला पवन कुमार! वाचा त्याच्याबद्दलच्या ५ भारी गोष्टी!

WhatsApp Group

PKL 9 : स्टार खेळाडू पवन कुमार सेहरावतनं प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेच्या नवव्या हंगामाच्या लिलावात इतिहास रचला आहे. तो प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यासह तो नऊ हंगामात दोन कोटींहून अधिक रुपयांना विकला जाणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याला तामिळ थलायवासने २ कोटी २६ लाख रुपयांना खरेदी केलं.

पवन कुमारसाठी ‘हे’ तीन संघ भिडले!

पवन कुमार सेहरावतसाठी लिलावाची बोली हरयाणा स्टीलर्सनं सुरू केली. त्यांनी एक कोटींच्या बोलीनं सुरुवात केली होती. यानंतर यू मुंबानं रस दाखवला. हरयाणा स्टीलर्सने माघार घेतल्यानंतर तामिळ थलायवासनं बोली लावली आणि शेवटपर्यंत लढत दिली. या तिन्ही संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा होती आणि याच कारणामुळे पवन कुमार सेहरावतची बोली दोन कोटींच्या पुढे गेली.

शेवटी तामिळ थलायवासनं पवन कुमारला खरेदी करण्यात यश मिळवलं. पवनची किंमत इतकी वाढली होती की बंगळुरू बुल्सकडं एफबीएम कार्ड वापरण्याची संधी नव्हती. PKL 9 मध्ये, चाहत्यांना पवन कुमार सेहरावत नवीन संघाकडून खेळताना दिसेल आणि तो पहिल्यांदाच या संघाचा भाग होणार आहे. पवन कुमार याआधी गेल्या काही हंगामात बंगळुरू बुल्सकडून खेळला होता आणि त्यानं सहाव्या हंगामात संघाला चॅम्पियन बनवलं होतं.

हेही वाचा – ग्रेट..! आता सुरेश रैनाला म्हटलं जाणार ‘डॉक्टर’ सुरैश रैना; वाचा झालंय काय!

PKL 8 मध्ये परदीप नरवाल प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आणि त्याला १ कोटी ६५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं. मात्र, यंदाच्या लिलावात आधी विकास कंडोला आणि नंतर पवन कुमार सेहरावत यांनी रेकॉर्ड मोडला. विकास कंडोला हा परदीप नरवालचा विक्रम मोडणारा पहिला खेळाडू होता आणि त्याला बंगळुरू बुल्सनं १.७० कोटी रुपयांना विकत घेतलं. तामिळ थलायवासनं त्यालाही विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी बुल्स यशस्वी झाले.

पवन कुमारच्या पाच भन्नाट गोष्टी!

  • २०१४ पासून प्रो कबड्डी लीग सुरू झाली आणि तेव्हापासून शेकडो खेळाडू स्पर्धेचा भाग बनले आहेत. अद्याप लीगमध्ये १००० गुण मिळवलेले केवळ पाच खेळाडू आहेत. पवन सेहरावतही त्या पाच खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी बंगळुरू बुल्सकडून खेळताना त्यानं ही कामगिरी केली होती. १०४ सामन्यांमध्ये पवननं १०३६ गुण मिळवले आहेत, त्यापैकी ९८६ चढाईत आले आहेत.
  • गेल्या महिन्यात, पवननं भारतीय रेल्वे संघाचं नेतृत्व करत सलग चौथ्यांदा वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप जिंकली. गेल्या सलग तीन मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली संघानं विजेतेपद पटकावलं आहे. अनेक खेळाडूंसाठी एकदाही राष्ट्रीय स्पर्धा जिंकणं ही मोठी गोष्ट आहे, पवननं कर्णधार म्हणून सलग तीन वेळा हे विजेतेपद पटकावलं आहे.
  • पवननं लीगच्या तिसर्‍या हंगामात बंगळुरू बुल्सकडून करिअरची सुरुवात केली. मात्र, पहिल्या तीन मोसमात फारशी चांगली कामगिरी न केल्यानं तो खूप निराश झाला होता आणि त्याला कबड्डी सोडायची होती. त्यानं त्याच्या कारकिर्दीत कमबॅक करण्याचं श्रेय रणधीर सिंग यांना दिलं आहे.
  • २०१७-१८च्या मोसमात पवन गुजरात जायंट्सच्या संघाचा भाग होता. पाचव्या हंगामापूर्वी त्याला बुल्सनं सोडले आणि गुजरातनं त्याला करारबद्ध करून लीगमध्ये पदार्पण केलं. गुजरातकडून पवनला फारशा संधी मिळाल्या नाहीत. जवळजवळ संपूर्ण हंगाम बेंचवर बसल्यानंतर सहाव्या हंगामापूर्वी त्याला सोडण्यात आलं.
  • २०१९च्या पर्वात हरयाणा स्टीलर्स विरुद्धच्या सामन्यात पवननं मोठा विक्रम केला होता. एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवणारा तो खेळाडू ठरला. त्या सामन्यात पवननं एकट्यानं ३९ गुण घेतले होते. आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर बुल्सनं हरयाणाचा ५९-३६ अशा फरकानं पराभव केला. पवनने चढाई टाकत त्याचे सर्व गुण घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment