“दोन वर्षांनी इन्स्टाग्राम उघडलं, डीपी बदलला आणि…” देशप्रेमी महेंद्रसिंह धोनीनं जिंकली मनं!

WhatsApp Group

MS Dhoni Har Ghar Tiranga : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्तानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. भारत सरकारच्या आवाहनावर ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत देशवासी तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर सोशल मीडियावर टाकत आहेत. आता या मोहिमेत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं नाव जोडलं गेलं आहे. धोनीनं शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्याचं प्रोफाइल फोटो बदलला आणि तिथं तिरंगा अपलोड केला. या फोटोवर एक खास संदेशही लिहिला आहे. ‘मी भारतीय आहे आणि हे माझं भाग्य आहे’, असं धोनीनं या फोटोवर म्हटलं आहे.

धोनी दोन वर्षानंतर इन्स्टाग्रामवर..

महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर असला तरी तो खूपच कमी सक्रिय असतो. धोनी बराच काळ फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट करत नाही, परंतु ‘हर घर तिरंगा’ फडकवण्याच्या विशेष मोहिमेत त्यानं भाग घेतला. जवळपास दोन वर्षानंतर धोनीनं इन्स्टाग्रामवर आला आणि त्यानं फोटो अपलो़ड केला. या मोहिमेत धोनीशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूही सहभागी झाले आहेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं आपल्या घरी तिरंगा फडकावला, त्याचबरोबर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तिरंगा मोहिमेत चाहत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलं.

हेही वाचा – हातात तिरंगा अन् मनात अभिमान..! आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘खास’ PHOTO; पाहा!

१५ ऑगस्ट आणि धोनी…

धोनीचं १५ ऑगस्ट या तारखेशी खास नातं आहे, त्यानं १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. केवळ सोशल मीडियावरच नाही तर क्रिकेटच्या मैदानावर तिरंग्याचा मान राखण्याबाबत धोनी कोणतीही चूक करत नाही. याच कारणामुळं तो हेल्मेटवर तिरंगा देखील लावत नाही कारण अनेकदा त्याला विकेटकीपिंगदरम्यान हेल्मेट खाली ठेवावं लागतं. क्रिकेटसोबतच धोनी भारतीय सैन्याशीही संबंधित आहे. क्रिकेटमधून ब्रेक घेत असताना तो अनेकवेळा सैन्यात प्रशिक्षणासाठी गेला आहे.

धोनीची यशस्वी कारकीर्द

महेंद्रसिंह धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्यानं आपल्या नेतृत्वाखाली भारताला टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. याशिवाय, त्यानं इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला चार विजेतेपदं दिली आहेत.

हेही वाचा – ‘दादा’गिरीला पुन्हा सुरुवात..! सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात; करणार भारतीय संघाचं नेतृत्व!

२००४ साली भारतीय संघात पाऊल ठेवणारा धोनी एकूण ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामने खेळला. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ४८७६ धावा केल्या ज्यात ३३ अर्धशतकं आणि ६ शतकं आहेत. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १०७७३ धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यानं ५०.५७ च्या सरासरीने धावा केल्या आणि त्याच्या नावावर ७३ अर्धशतकं आणि १० शतकं आहेत. त्याचबरोबर धोनीनं टी-२० मध्ये १६१७ धावा केल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment