

मुंबई : आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर एक नाव ट्रेंड होऊ लागलं. भले हार्दिक पंड्याला तुलनेनं या दुबळ्या मोहिमेसाठी टीम इंडियाचा कप्तान बनवण्यात आलं, पण तोसुद्ध तितका चर्चेत आला नाही, जेवढा राहुल त्रिपाठी आला. राहुल त्रिपाठीला भारतीय संघात जागा द्या, असं म्हणणाऱ्यांसाठी सोनियाचा दिनू उगवला. ३१ वर्षीय राहुलला उशिरा का होईना, पण भारतीय संघाचं ड्रेसिंग रुम खुणावलं. तुफान मेहनत, डोमेस्टिक-आयपीएलमध्ये धावांचा सारखा डोंगर उभा करूनही राहुल सुवर्णसंधीपासून चुकत होता. पण १५ जून २०२२ला मिळालेल्या आनंदाच्या बातमीनं राहुल सर्वत्र फेमस झाला.
राहुल त्रिपाठीला अखेर भारतीय संघात संधी मिळाली. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत राहुलचा समावेश करण्यात आला. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या राहुलला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेतच टीम इंडियाचं तिकीट मिळेल असं वाटत होतं, पण निवड समितीनं त्याला डावललं.
आयपीएल २०२२च्या महालिलावात, ४० लाखांची बेस प्राइज असणाऱ्या राहुल त्रिपाठीला सनरायझर्स हैदराबादनं ८.५ कोटींमध्ये विकत घेतलं. लीगमधील १४ सामन्यांमध्ये राहुलनं ३७.५५च्या सरासरीनं आणि १५८.२४च्या स्ट्राइक रेटनं ४१३ धावा केल्या. तो मोसमातील सर्वाधिक धावा करणारा ‘अनकॅप्ड’ खेळाडू होता. आयपीएल २०२१मध्येही राहुलनं धावांचा रतीब घालत कोलकाता नाइट रायडर्ससाठी १४०च्या स्ट्राइक रेटनं ३९७ धावा केल्या.
Hardik Pandya – Captain ✅
Sanju Samson – Called back ✅
Rahul Tripathi – Maiden call-up ✅BCCI have announced Team India’s squad for the upcoming T20I series against Ireland 👏👏#India #HardikPandya #SanjuSamson #RahulTripathi #IREvsIND #Cricket pic.twitter.com/Nc48rlXXxC
— Wisden India (@WisdenIndia) June 15, 2022
राहुलची कर्मभूमी महाराष्ट्र!
भारताचा कॅप्टन कूल धोनीच्या रांचीत राहुल त्रिपाठी जन्मला. त्याचे वडील सैन्यात होते, त्यामुळे राहुल अनेक ठिकाणी राहिला. अखेरीस तो पुण्याला गेला आणि महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला. २०१७मध्ये रायझिंग पुणे जायंट्सनं राहुलला पहिल्यांदा संधी दिली. पहिल्याच हंगामात त्यानं १४ सामन्यात १४६.४४च्या स्ट्राईक रेटनं ३९१ धावा चोपत आपण विश्वासू फलंदाज असल्याचं सर्वांच्या मनावर बिंबवलं.
🚨 NEWS 🚨: India’s squad for T20I series against Ireland announced.#TeamIndia
— BCCI (@BCCI) June 15, 2022
फिटनेस, विराट कोहली आणि राहुल त्रिपाठी…
फिटनेसच्या बाबतीत राहुल त्रिपाठीची तुलना थेट विराट कोहलीशी होते. फलंदाजीत तो चांगला आहे, पण मैदानावरची त्याची चपळता वाखाणण्याजोगी आहे. भारताचा भज्जू-पा म्हणजेच हरभजन सिंग त्याच्या फिटनेसवर फिदाच आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या शेवटच्या काळात त्यानं राहुलला अगदी जवळून बघितलं. आयपीएल २०२१मध्ये भज्जी राहुलसोबत कोलकाताच्या टीमचा भाग होता. ”मी राहुल त्रिपाठीला ट्रेनिंग करताना पाहिलंय. हा खेळाडू खूप उत्साही आहे. तो जिममध्ये प्रत्येक प्रकार करतो आणि त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो, ज्या अनेक लोकांना करता येत नाहीत. तो फिटनेसबद्दल खूप उत्साही आहे आणि तो विराट कोहलीनंतरचा दुसरा खेळाडू आहे जो फिटनेसबद्दल इतका गंभीर आहे. फिटनेसच्या बाबतीत तो कोहलीला मागं टाकणारा एकमेव व्यक्ती आहे”, असं बोल्ड स्टेटमेंट भज्जीनं केलं होतं.