IPL 2023 : जिंकण्यासाठी 1 बॉल 5 रन्स, संदीप शर्माचा नो बॉल, समदचा SIX..हैदराबादचा विजय!

WhatsApp Group

IPL 2023 RR vs SRH Sunrisers Hyderabad Win : शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अब्दुल समद झेलबाद झाला. गोलंदाज संदीप शर्मासह राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला, पण अंपायरने नो-बॉलची खूण करत सामनाच पालटला. मग फ्री हिट मिळालेल्या समदने संदीपला खणखणीत षटकार खेचत संघाला रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवून दिला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रेक्षकांनी शेवटच्या षटकातील थरार अनुभवला.

आयपीएल 2023 मध्ये स्पर्धेचा 52वा सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानला 4 विकेट्सने मात देत स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवले. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने सलामीवीर जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादला 215 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादनेही चोख प्रत्युत्तर दिले. सलामीवीर अभिषेक शर्मा (55), राहुल त्रिपाठी (47), ग्लेन फिलिप्स (25) आणि अब्दुल समद (नाबाद 17) यांनी सिंहाचा वाटा उचलत विजयात योगदान दिले. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने 4 विकेट्स काढत सामन्यात रंगत निर्माण केली. पण वेगवान गोलंदाज संदीप शर्माची एक चूक महागात पडली.

हेही वाचा  – IPL 2023 : अरेरे..बटलरची सेंच्युरी हुकली! भुवीच्या ‘अचूक’ यॉर्करने केला घोटाळा; पाहा Video

नो बॉल ड्रामा

हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज होती. सॅमसनने अनुभवी संदीप शर्माकडे चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर समदने 2 धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर त्याने सरळ षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूववर समदने एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर मार्को जानसेनला एक धाव घेता आली. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना समदने लाँग ऑफला हवेत फटका खेळला. त्याचा झेल जोस बटलरने टिपला. संदीपने हवेत दोन्ही हात उंचावत आनंद साजरा केला खरा, पण पंचांनी नो बॉलचा इशारा केला. संदीपने गोलंदाजी करताना रेषेच्या पुढे जाऊन चेंडू टाकला. पुढच्याच चेंडूवर समदने सरळ षटकार खेचत हैदराबादला विजय मिळवून दिला.

राजस्थानचा डोंगर

टॉस जिंकलेल्या राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि बटलरने 54 धावांची सलामी दिली. यशस्वीने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने बटलरसोबत फटकेबाजी केली. सॅमसनने अर्धशतक केले. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. तर बटलरने 59 चेंडुंचा सामना करत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 95 धावांची खेळी केली. हैदराबादचे गोलंदाज या दोघांपुढे निष्प्रभ ठरले. हैदराबादचा फिरकीपटू मयंक मार्कंडे महागडा ठरला. त्याने 4 षटकात 51 धावा दिल्या. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 214 धावा उभारल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment