हॅट्सऑफ..! फक्त ४० रुपयात धोनी करून घेतोय आयुर्वेदिक उपचार; कोण आहे त्याचा डॉक्टर?

WhatsApp Group

मुंबई : पैसा आला की माणूस आपल्या गरजांची पूर्तता चांगल्या रितीनं करतो. स्वत: चं लाइफस्टाइल सुधारतो, मोठ्या हॉटेलमध्ये जेवतो, चांगल्या ठिकाणी राहतो, चांगल्या आरोग्याच्या सुविधांचा लाभ घेतो. पण काही माणसं कितीही ‘मोठ्ठी’ झाली, तरीही त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. अशातलाच एक महेंद्रसिंह धोनी. पठ्ठ्या रिटायर झाला असला, तरी त्याची ‘क्रेझ’ काही कमी झालेली नाही. आयपीएलमध्येही तो आपली कामगिरी दाखवतोय. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असूनही तो कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येतो. धोनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणामुळं सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार म्हणून ओळख कमावलेला धोनी सध्या गुडघेदुखीमुळं त्रासलाय. पण यासाठी तो कोणत्याही ‘हाय-फाय’ आरोग्य सुविधांचा लाभ घेत नाहीये. यासाठी त्यानं जे केलंय, ते वाचून तुम्हाला नक्कीच भारी वाटेल.

धोनीचा डॉक्टर कोण?

गुडघेदुखीवर देशात किंवा परदेशातील कोणत्याही महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेण्याऐवजी धोनीनं वेगळा प्रयत्न करून पाहायचं ठरवलंय. रांची जवळच्या जंगलात एका स्थानिक डॉक्टरकडून तो औषधं घेतोय. रांचीला लागून असलेल्या गावात झाडाखाली बसलेल्या एका वैद्याकडून उपचार घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या वैद्याचं नाव आहे बंधनसिंग खरवार.

दर चार दिवसांनी धोनी…

”जेव्हा धोनी उपचार घेण्यासाठी आला तेव्हा मला माहीत नव्हतं, की टीम इंडियाचा माजी कर्णधार आपल्या समोर बसला आहे. टीव्हीवर दिसणं आणि समोर दिसणं यात मोठा फरक आहे”, असं खरवार यांनी सांगितलं. धोनीवर वन्य औषधी वनस्पतींच्या मदतीनं उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक रुग्णाप्रमाणे ते उपचारासाठी धोनीकडूनही ४० रुपये घेतात. यात २० रुपये त्यांची फी आहे आणि २० रुपये ते औषधाचे घेतात. दर चार दिवसांनी उपचारासाठी धोनी सामान्य रुग्णाप्रमाणे रांचीपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या लापुंगमधील गलगली धाममध्ये येतो. धोनी येताच असंख्य चाहते जमा होऊ लागतात. म्हणूनच आता तो गावात पोहोचतो आणि गाडीत बसतो, जिथे त्याला औषधं दिली जातात. मिळालेल्या माहितीनुसार, धोनी गेल्या एक महिन्यापासून उपचारासाठी तिथं येतो. गावातील अनेक लोकांनी त्याच्यासोबत फोटोही काढले आहेत.

धोनी देशी गाईचं दूध, झाडाची साल आणि अनेक वनौषधींपासून बनवलेलं औषध घेतोय. त्याच्या पालकांनीही येथूनच या डॉक्टरवर उपचार करून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. झारखंड व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि छत्तीसगड येथूनही लोक उपचारासाठी येथे पोहोचतात. वैद्य बंधनसिंह खरवार यांनी तयार केलेले औषध प्यायल्यानं सांधेदुखी पूर्णपणे बरी होते, असे सांगितलं जातं.

Leave a comment