WTC Final 2023 : रहाणे, ठाकूरची अर्धशतके, तरीही ऑस्ट्रेलियाचा बोलबाला!

WhatsApp Group

WTC Final 2023 IND vs AUS Day 3 Stumps : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल (WTC फायनल 2023) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर चमकले. दोघांनी आपापली अर्धशतके ठोकली. तब्बल 19 महिन्यांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या रहाणेने परतीच्या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. अर्थात, त्याचे शतक 11 धावांनी हुकले, परंतु त्याने आपल्या अतुलनीय खेळीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रहाणे आणि शार्दुलच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताला फॉलोऑन वाचवण्यात यश आले.

भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. कांगारू संघाला पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 123 धावा केल्या आहेत. त्यांची एकूण आघाडी आता 296 धावांवर पोहोचली आहे. मार्नस लबुशेन 41 धावा करून नाबाद परतला तर कॅमेरून ग्रीन 7 धावांवर खेळत आहे.

हेही वाचा – WTC Final 2023 : …आणि मार्नस लाबुशेनची झोपच उडाली! नक्की काय घडलं? पाहा Video

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. उस्मान ख्वाजाच्या रूपाने ऑस्ट्रेलियाने दुसरी विकेट गमावली. एकूण 24 धावांवर ख्वाजाची विकेट पडली. उमेशने ख्वाजाला तर सिराजने वॉर्नरला बाद केले. स्टीव्ह स्मिथने 34 धावांचे योगदान दिले तर पहिल्या डावातील शतकवीर ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या डावात 18 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाने 2 तर सिराज आणि उमेश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment