Bihar Suicide Case : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. एका वडिलांनी स्वतःच्या पाचही लहान मुलांना एकामागोमाग फासावर लटकवून त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेत सहा वर्षांचा शिवम आणि पाच वर्षांचा त्याचा धाकटा भाऊ चंदन हे दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावले.
“पप्पा बाथरूमला गेले आणि परत येऊन सर्वांना फासावर लटकवले”
घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी असलेला सहा वर्षांचा शिवम जेव्हा हा प्रसंग सांगतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत भीती आणि आवाजात अपार वेदना स्पष्टपणे जाणवतात. शिवमने सांगितले की, “मी पप्पा आणि बहिणींसोबत घरातच होतो. मला झोप येत नव्हती म्हणून मी मोबाइल पाहत होतो. पप्पा बाथरूमला गेले आणि परत आल्यावर त्यांनी एकामागोमाग सर्व बहिणींना फासावर लटकवले. नंतर माझ्या आणि भावाच्या गळ्यातही दोरी बांधली.”
वडिलांनी शिवम आणि चंदन यांनाही फासावर लटकवले होते. मात्र, सुदैवाने खाली ठेवलेल्या पेटीवर त्यांचे पाय टेकल्यामुळे दोघांचे प्राण वाचले. या घटनेत वडील अमरनाथ राम, 12 वर्षांची अनुराधा, 11 वर्षांची शिवानी आणि 7 वर्षांची राधिका या तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला. काही तास उलटूनही शिवम आणि चंदन या भीषण अनुभवाच्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत.
आईच्या मृत्यूनंतर वडील मानसिक तणावात?
पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमरनाथ राम यांच्या पत्नीचे सुमारे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ते मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते. मात्र, इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस तपास सुरू, अंधश्रद्धेचा संशय?
घटनेची माहिती मिळताच सकरा पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक (FSL) पथकाकडून तपास सुरू आहे. घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. पोलिस अंधश्रद्धा, कौटुंबिक तणाव किंवा अन्य कोणता गुप्त कारणांचा तपास करत आहेत. बुराडी प्रकरणासारख्या घटनांची आठवण या घटनेने पुन्हा ताजी केली आहे.
समाजासाठी धक्कादायक इशारा
ही घटना केवळ एक गुन्हा नसून, मानसिक आरोग्य, एकाकीपणा आणि कौटुंबिक आधार यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. वेळेवर मानसिक आधार मिळाला असता, कदाचित हे निष्पाप जीव वाचले असते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा