Doctor Beats Patient Viral Video : रुग्णालय म्हणजे माणुसकी, उपचार आणि विश्वासाचे ठिकाण… पण याच रुग्णालयात जर डॉक्टरच रुग्णावर हात उचलत असेल, तर समाज हादरून जातो. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे असलेल्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (IGMC) मधील धक्कादायक प्रकाराने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
एंडोस्कोपीसाठी गेलेला रुग्ण, श्वास घ्यायला त्रास झाल्यावर रिकाम्या बेडवर झोपला
सोमवार, 22 डिसेंबर रोजी अर्जुन पंवार नावाचा रुग्ण IGMC मध्ये एंडोस्कोपी (ब्रॉन्कोस्कोपी) तपासणीसाठी दाखल झाला होता. तपासणीनंतर अर्जुनला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे थोडा आराम मिळावा म्हणून तो जवळच्या दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन रिकाम्या बेडवर झोपला.
डॉक्टरचा संताप अनावर…
याच दरम्यान ड्युटीवर असलेला एक डॉक्टर तेथे पोहोचला आणि काहीतरी विचारण्यावरून वाद झाला. आरोप असा आहे की या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. डॉक्टरने रुग्ण अर्जुन पंवारला लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.
16 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा 16 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की बेडवर झोपलेल्या रुग्णावर डॉक्टर जोरजोरात लाथा आणि मुठी मारतो आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी रुग्णानेही डॉक्टरला लाथ मारल्याचे व्हिडिओत दिसते. आसपासचे काही लोक दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही क्षण मारहाण थांबलीच नाही.
रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप, रुग्णालयात गोंधळ
घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. नातेवाईकांनी घोषणाबाजी करत आरोपी डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यांचा आरोप होता की IGMC मध्ये याआधीही अशा घटना घडल्या आहेत, मात्र नेहमीच त्याकडे दुर्लक्ष झाले.
चौकशी समिती गठीत, डॉक्टर सस्पेंड
प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने चौकशी समिती स्थापन केली.
IGMC चे मेडिकल डायरेक्टर डॉ. राहुल राव यांनी सांगितले की ही घटना दुपारी 12:30 ते 1:00 दरम्यान घडली. रुग्ण OPD मधील होता आणि त्याला अधिकृत बेड अलॉट करण्यात आलेला नव्हता.
प्राथमिक चौकशीत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात काही प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्याचे समोर आले असून, तो वाद पुढे हिंसेत बदलला.
आरोग्य मंत्र्यांचा कडक इशारा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्य मंत्री कर्नल डॉ. धनी राम शांडिल म्हणाले —
“रुग्णांशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा बदतमीजी अजिबात सहन केली जाणार नाही. लवकरच सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील.”
मुख्यमंत्रीही गंभीर, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या घटनेची माहिती सरकारपर्यंत पोहोचताच आरोपी डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याला वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी देखील या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा