ENG vs IND : रोहित शर्माचा जबरदस्त षटकार आणि चिमुरडीला बसला बॉल..! पुढं काय झालं? पाहा VIDEO

WhatsApp Group

मुंबई : टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. द ओव्हल मैदानावर पहिला सामना खेळला गेला. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी घेतली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी तिखट मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. बुमराहनं तर कहरचं केला. त्याने ७.२ षटकांत १९ धावांत ६ बळी घेतले. त्यामुळं इंग्लंडचा संघ अवघ्या ११० धावांत ढेपाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीनं भारताचा विजय पूर्ण १० विकेट्ससह साजरा केला. अशा प्रकारे टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा संघ फलंदाजी करत असताना एक घटना घडली. चौथ्या षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद ८ धावा होती. पाचव्या षटकात वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीनं मारा केला. पहिल्या दोन चेंडूत एकही धाव न मिळाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रोहितनं राग काढत षटकार ठोकला. त्यानं फ्रंट फूटवरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेळला. चेंडू सरळ जाऊन स्टँडवर बसलेल्या एका छोट्या मुलीला लागला. कॅमेरामननं हा षटकार प्रकार स्टेडियममधील मोठ्या पडद्यावर दाखवल्यानं सर्वजण काही काळ स्तब्ध झाले. सामना थोडा वेळ थांबवण्यात आला.

या घटनेनंतर प्राथमिक उपचार देण्यासाठी इंग्लंड संघाचे फिजिओ लगेचच तिथं धावले. घटनेदरम्यान रवी शास्त्री आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टन कॉमेंट्री करत होते. दुखापतग्रस्त मुलगीी बरी असून रोहित शर्माने तिला चॉकलेट दिले आणि तिची विचारपूसही केली.

भारताचा सहज विजय..

भारतीय संघानं इंग्लंडचे १११ धावांचं लक्ष्य केवळ १८.४ षटकात गाठलं आणि सामना जिंकला. एकदिवसीय इतिहासात पहिल्यांदाच भारतानं इंग्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मानं नाबाद ७६ धावा केल्या तर सहकारी सलामीवीर शिखर धवन ३१ धावा करून नाबाद तंबूत परतला. टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारताने आता वनडे मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.

 

Leave a comment