Robbie Coltrane Death : ‘हॅग्रिड’च्या निधनानंतर हॅरी पॉटरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मला भेटलेल्या…”

WhatsApp Group

Robbie Coltrane Death : सुपरहिट फ्रँचायझी ‘हॅरी पॉटर’मध्ये ‘हॅग्रिड’ची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबी कोलट्रेन यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉबी बऱ्याच काळापासून आजारी होते. ते ७२ वर्षांचे होते. रॉबी यांची एजंट बेलिंडा राइटने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. स्कॉटलंडमधील लार्बर्ट येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रॉबी यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातील चाहते आता शोकसागरात बुडाले आहेत. अभिनेता आता आपल्यात नाही यावर त्यांच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर रॉबीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – रोहित, विराटवर टीका केली म्हणून मित्रालाच संपवलं; वाचा पूर्ण बातमी!

हॅग्रिड नेहमी हृदयात जिवंत असेल

‘हॅरी पॉटर’ चित्रपटांमुळे रॉबी यांना विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात ते हॅग्रिडच्या भूमिकेत दिसले, तो हॉगवर्ड्स या शाळेतील द्वारपाल होता. ‘हॅरी पॉटर’ फ्रँचायझीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘रिटर्न टू हॉगवर्ड’ शोमध्ये रॉबी यांना शेवटचे पाहिले गेले होते. हॅरी पॉटरची लेखिका जेके रोलिंग यांनीही रॉबी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हॅरी म्हणाला…

हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डॅनियल रॅडिक्लिफने रॉबी यांच्या निधनाननंतर म्हटले, ”रॉबी मला भेटलेल्या सर्वात मजेदार लोकांपैकी एक होता आणि सेटवर लहान मुले म्हणून तो आम्हाला सतत हसत ठेवत असे… मी भाग्यवान समजतो की मला त्याच्यासोबत काम करायला मिळाले… तो एक अतुलनीय अभिनेता होता. सुंदर माणूस.”

Leave a comment