Mumbai Pune Expressway Traffic Jam : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातामुळे संपूर्ण महामार्ग अक्षरशः ठप्प झाला. रायगड जिल्ह्यातील आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपिलीन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने तब्बल 15 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प राहिली. या घटनेमुळे लाखो प्रवासी तासन्तास रस्त्यावर अडकून पडले, तर एका उद्योगपतीने अखेर हेलिकॉप्टरचा पर्याय निवडत स्वतःची सुटका करून घेतली.
ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता हे या वाहतूक कोंडीत जवळपास 8 तास अडकले होते. परिस्थिती असह्य झाल्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुण्याकडे प्रवास केला. यासंदर्भातील हवेतून घेतलेले दृश्यचित्र त्यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर प्रसिद्ध करत, महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
डॉ. मेहता यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “एका गॅस टँकरमुळे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या 18 तासांपासून लाखो लोक अडकले आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरते बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.”
Lacs of people are stuck on the #Mumbai #Pune expressway for the last 18 hours for “one gas tanker “ . For such emergencies we need to plan exits at different points on expressway which can be opened to allow vehicles to return. Helipads cost less than Rs 10 lacs to make and… pic.twitter.com/u2EooiKjh3
— Dr. Sudhir Mehta (@sudhirmehtapune) February 4, 2026
इतक्यावरच न थांबता त्यांनी उपाययोजनाही सुचवल्या. “हेलिपॅड उभारण्यासाठी दहा लाख रुपयांपेक्षा कमी खर्च येतो आणि एक एकरपेक्षा कमी जागा पुरेशी असते. महामार्गाजवळ विविध ठिकाणी आपत्कालीन स्थलांतरासाठी हेलिपॅड असणे बंधनकारक केले पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेलिकॉप्टरद्वारे मदत केल्याबद्दल त्यांनी हवाई दलाचे माजी अधिकारी आणि नागरी विमानवाहतूक सल्लागार नितीन वेल्डे यांचे आभार मानले.
अपघात नेमका कसा झाला?
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता आडोशी बोगद्याजवळ उतारावरून जात असताना भरधाव वेगात असलेला गॅस टँकर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. अपघातानंतर वायूगळती सुरू झाल्याचे निदर्शनास येताच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली.
या घटनेचा फटका केवळ मुंबई–पुणे एक्सप्रेसवेच नव्हे, तर जुना मुंबई–पुणे महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग 48) यालाही बसला. दोन्ही मार्गांवरील वाहतूक मर्यादित करण्यात आल्याने परिसरात प्रचंड गोंधळ उडाला.
रात्रभर रस्त्यावर अडकले प्रवासी
वाहतूक कोंडी इतकी तीव्र होती की शेकडो वाहने रात्रभर रस्त्यावरच अडकून पडली. महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय नसताना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अनेक प्रवाशांनी प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, प्रशासनाने प्रवाशांना लोणावळा–खंडाळा घाट परिसर टाळण्याचा सल्ला दिला असून, प्रवास करण्यापूर्वी वाहतूक सूचनांची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा