South Africa Mass Shooting : दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची भीषण घटना समोर आली असून,जोहान्सबर्गजवळ अज्ञात बंदूकधार्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर मागून गोळीबार केल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून, किमान 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्यावर चालणाऱ्यांवर मागून गोळ्यांचा वर्षाव
द गार्डियन आणि अल जजीराच्या वृत्तानुसार, ही घटना जोहान्सबर्गपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेकर्सडेल परिसरात घडली. हा भाग गरीब वस्तीचा असून, जवळच सोने खाण परिसर आहे. गोळीबार शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सुमारे 1 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला.
🚨 How Many More?: South Africa Shooting, 9 Dead, 10 Injured in Johannesburg; Second Mass Attack in a Month 👀 pic.twitter.com/Xr6yFBLV8Y
— Indian Info Lead 🇮🇳 (@Indianinfolead) December 21, 2025
गौतेंग प्रांताच्या पोलीस प्रवक्त्या ब्रिगेडियर ब्रेंडा मुरिडिली यांनी सांगितले की, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. ही घटना एका दारूच्या दुकानाजवळ (शराबखाना) घडली असून, हल्लेखोरांनी तेथील ग्राहकांवर थेट गोळीबार केला.
दोन वाहनांतून आले, गोळीबार करून पसार
पोलिसांच्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या कॉम्बी व्हॅन आणि सिल्व्हर सेडान कारमधून आलेल्या सुमारे 12 अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
विशेष म्हणजे, पळून जाताना देखील हल्लेखोरांनी रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप नागरिकांवर मागून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढला.
या हल्ल्यात बारबाहेर उभ्या असलेल्या एका कॅब ड्रायव्हरचाही गोळी लागून मृत्यू झाला, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या सार्वजनिक प्रसारक SABC ने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.
फॉरेन्सिक व गुप्तचर पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच नॅशनल क्राईम मॅनेजमेंट टीम, फॉरेन्सिक पथक आणि गुप्तचर विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात असून, हल्लेखोरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महिन्याभरात दुसरी मोठी गोळीबाराची घटना
विशेष म्हणजे, याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ही दुसरी मोठी सामूहिक गोळीबाराची घटना आहे. 6 डिसेंबर रोजी राजधानी प्रिटोरियाजवळील एका हॉस्टेलवर झालेल्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्यासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या दारू विक्री सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.
वाढता गुन्हेगारी दर, नागरिकांमध्ये भीती
दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे 6.3 कोटी असून, येथे गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय जास्त आहे. वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढत आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा