

मुंबई : आजच्या काळात प्रत्येक तरुण-तरुणीला लय भारी फिटनेस हवा असतो. काहीजण पर्सनल फिटनेस ट्रेनर लावून आपल्या आरोग्याची काळजी घेतात. पण एकदम सिक्स-पॅक असलेली बॉ़डी कमावणं इतकं सोपं नसतं. माणसाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात, खाण्यापिण्यात स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवावं लागते आणि स्वतःला चॅलेंज करावं लागतं. २५-३० वय असणाऱ्यांना बॉडी बनवणं तुलनेनं सोपं असतं, पण मोठ्या वयात जॉन अब्राहमसारखी बॉडी बनवणं म्हणजे कठीणच काम. पण या सगळ्या चर्चांना दूर ठेवत आपल्यासमोर असे फोटो व्हायरल झाले, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतील. एका वृद्ध महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जिनं आपल्या पिळदार शरीरयष्टीनं सर्वाना ४४० वोल्टचा धक्का दिलाय.
कोण आहेत या आजी?
अमेरिकेतील टेक्सास येथे राहणारी ७० वर्षीय रेनी लँडर्स ही घटस्फोटित महिला आहे. २०१०मध्ये त्यांच्या पाठीच्या खालच्या भागात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. याच कारणामुळं त्यांच्या हाडांवर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर, त्यांनी ठरवलं की तंदुरुस्त शरीर बनवायचं. तेव्हापासून त्यांनी जिममध्ये जाण्यास सुरुवात केली आणि आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करण्यास सुरुवात केली.

यानंतर रेनी यांनी बॉडीबिल्डिंग करण्याचं ठरवलं. मे २०२१मध्ये, वयाच्या ६९व्या वर्षी, तिनं प्रथमच बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत सर्व स्पर्धक रेनी यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होते. रेनी यांनी सहावं स्थान मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं. तेव्हापासून त्यांची बॉडीबिल्डिंगची आवड आणखीनच वाढली असून त्यांनी आतापर्यंत चार स्पर्धेत भाग घेतला आहे.
रेनी यांचं मत…
रेनी म्हणाल्या, ”माझा मुलगा आणि नातू झाल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता जेव्हा मी ही स्पर्धा जिंकली. मी याआधी कधीच इतकी फिट नव्हती. विसाव्या वर्षात असतानाही मी इतकी तंदुरुस्त नव्हती. मला असंच आयुष्य हवं आहे आणि आता मी खूप आनंदी आहे. मी माझ्या तब्येतीची खूप काळजी घेते. माझ्या मुलाच्या जन्मापूर्वी मी दररोज ९ किलोमीटर जॉगिंग करायची.”