

Alka Kubal And Priya Berde Fined : मुंबई उच्च न्यायालयाने ‘माहेरची साडी’ फेम अलका कुबल, मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना दणका दिला आहे. पुण्यातील ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात लाखोंचा खर्च केल्याप्रकरणी न्यायालयाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना १० लाख ७८ हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके या तीन माजी अध्यक्षांसह अलका कुबल, प्रिया बेर्डे आदी १५ माजी पदाधिकारी व संचालक यांचा समावेश आहे.
पुण्यात ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम २०१२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. यात जवळपास ५२ लाख रूपये खर्च केल्याचा आरोप संचालकांवर होता. सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने तात्कालीन संचालकांना एका आठवड्यात १० लाख ७८ हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच सर्व संचालकांवर अशी कारवाई झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – PM नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा कट? ईडीनं केला ‘मोठा’ खुलासा! वाचा…
कोण होते ते पदाधिकारी?
प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, माजी खजिनदार सतीश बीडकर, माजी सहखजिनदार अनिल निकम, माजी कार्यवाह सुभाष भुरके, माजी सहकार्यवाह संजीव नाईक, संचालक सतीश रणदिवे, माजी संचालिका प्रिया बेर्डे, अलका कुबल, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती व प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांचा या पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. २०१० ते २०१५ या कालावधीत हे पदाधिकारी होते.