IPL 2023 : ‘हा’ विश्वविजेता खेळाडू बनला सनरायझर्स हैदराबादचा नवा कॅप्टन..! वाचा

WhatsApp Group

IPL 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी, सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सनरायझर्स हैदराबाद बऱ्याच दिवसांपासून नव्या कर्णधाराच्या शोधात होते. इंडियन प्रीमियर लीग २०२३ मिनी-लिलावापूर्वी केन विल्यमसनला सनरायझर्स हैदराबादने सोडले होते, त्यानंतर फ्रेंचायझी नवीन कर्णधाराच्या शोधात होती.

एडन मार्कराम हा यशस्वी कर्णधार

एडन मार्करामने अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली जानेवारी २०२२ मध्ये सनरायझर्स इस्टर्न केपला SA20 चे विजेतेपद मिळवून दिले. मार्कराम यांच्याकडे नेतृत्वाचा महत्त्वपूर्ण अनुभव आहे. त्याने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपदही जिंकले. काही काळ तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधारही होता.

भुवनेश्वर आणि मयंकही होते शर्यतीत

सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फलंदाज मयंक अग्रवालही होते. पण या दोघांना मागे टाकून एडन मार्करामकडे सनरायझर्स हैदराबादची कमान आली. हैदराबादने मार्करामला नवी आशा देऊन कर्णधार बनवले आहे. सनरायझर्स हैदराबाद २०२१ च्या हंगामात टेबलमध्ये तळाशी राहिले.

हेही वाचा – OMG चिकन खाताच लकवा मारला..! मरता मरता वाचला माणूस; वाचा नक्की झालं काय?

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करामला सनरायझर्स हैदराबादने (SRH) ₹ २.६० कोटींना विकत घेतले. एडन मार्करामने पहिल्या सत्रात ४७.६३ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या.

SA20 लीगमध्ये चमकदार कामगिरी

मार्कराम हा पहिल्या SA20 हंगामाच्या सुरूवातीच्या अगोदर सनरायझर्स इस्टर्न केपसाठी लिलावपूर्व निवड होता. त्याने १२ सामन्यात ३६६ धावा केल्या ज्यात जोहान्सबर्ग सुपर किंग्ज विरुद्धच्या उपांत्य फेरीतील शतकाचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याची गोलंदाजी देखील उत्कृष्ट होती, त्याने ६.१९च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्सही घेतल्या.

आयपीएल २०२३

बीसीसीआयने यावर्षी होणाऱ्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टाटा आयपीएल २०२३ ३१ मार्चपासून सुरू होणार आहे, ज्यातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment