

Babar Azam Pakistan’s Prime Minister : टी-२० विश्वचषक २०२२ मधून बाहेर होण्याच्या मार्गावर उभा असलेला पाकिस्तान आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. इंग्लंडने सेमीफायनलमध्ये भारताचे स्वप्न भंगवले आणि अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे २००९ मध्ये पाकिस्तानने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकला होता, तर इंग्लंड २०१०चा चॅम्पियन होता. दरम्यान, जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेले सुनील गावसकर यांनी बाबर आझमबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जात आहे. याच मैदानावर १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. ३० वर्षांपूर्वी एमसीजीमध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली ‘मेन इन ग्रीन’ संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. विशेष म्हणजे त्यावेळीही इंग्लंड समोर होता, ज्याला पाकिस्तान २२ धावांनी हरवून चॅम्पियन झाला होता. आता हा विचित्र योगायोग आहे की मैदानही मेलबर्नचे आहे, अंतिम फेरीतील संघही पाकिस्तान आणि इंग्लंड आहेत.
हेही वाचा – PAK Vs ENG Final : इंग्लंडच्या खेळाडूंच्या हाताला काळी पट्टी, ‘हे’ आहे कारण!
— Guess Karo (@KuchNahiUkhada) November 10, 2022
गावसकर यांचे भाकीत
मोठ्या संख्येने चाहतेही हा योगायोग योग्य मानत आहेत आणि त्यांना वाटते की पाकिस्तान टी-२० वर्ल्डचॅम्पियन होईल. एवढेच नाही तर बाबर आझम भविष्यात पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकतात, असे बोलले जात आहे. इम्रान खानच्या बाबतीतही हे दिसून आले. १९९२चा विश्वविजेता कर्णधार इम्रान खान २०१८ मध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान झाला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही याबाबत मत दिले. गावसकर म्हणाले, ”जर पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप जिंकला तर २०४८ मध्ये बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होईल. शेन वॉटसन आणि मायकेल अथर्टन यांनाही गावसकरांकडून हे वक्तव्य ऐकून हसू आवरता आले नाही.