Bangladesh Violence : बांगलादेशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीपूर जिल्ह्यातील सदार उपजिल्ह्यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या एका नेत्याच्या घराला कुलूप लावून पेटवण्यात आले, या भीषण आगीमध्ये 7 वर्षांच्या चिमुरड्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर तीन जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत.
ही घटना शनिवारी पहाटे घडली. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, भाबानिगंज युनियनमधील BNP चे सहाय्यक संघटन सचिव आणि व्यावसायिक बेलाल हुसैन यांच्या घरावर हा अमानुष हल्ला करण्यात आला.
घराला बाहेरून कुलूप, पेट्रोल ओतून आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी घराच्या दोन्ही दरवाजांना बाहेरून कुलूप लावले आणि त्यानंतर पेट्रोल ओतून घराला आग लावली. या घरात त्या वेळी बेलाल हुसैन यांचे संपूर्ण कुटुंब झोपेत होते.
या आगीमध्ये बेलाल हुसैन यांची 7 वर्षांची मुलगी आयेशा अक्तर हिचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर बेलाल हुसैन स्वतः आणि त्यांच्या दोन मुली — 16 वर्षांची सलमा अक्तर आणि 14 वर्षांची सामिया अक्तर — या गंभीररीत्या भाजल्या गेल्या आहेत.
वडील रुग्णालयात, मुली ढाक्याला हलवण्यात आल्या
लक्ष्मीपूर सदार मॉडेल पोलीस ठाण्याचे अधिकारी (OC) मोहम्मद वहीद परवेज यांनी घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, “या हल्ल्यामागे कोण आहे आणि यामागील नेमका हेतू काय आहे, याचा तपास सुरू आहे.” रुग्णालयातील माहितीनुसार, बेलाल हुसैन यांना लक्ष्मीपूर सदार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्यांच्या दोन्ही मुलींची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना ढाक्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी येथे हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही मुलींच्या शरीराचा 50 ते 60 टक्के भाग भाजलेला आहे.
आजीचा आरोप : “मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न”
या घटनेबाबत बेलाल हुसैन यांच्या आई हाजेरा बेगम यांनी अंगावर काटा आणणारी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “रात्री जेवणानंतर मी झोपले होते. पहाटे 1 वाजता उठले असता माझ्या मुलाचे टिनशेड घर जळताना दिसले. मी धावत गेले, पण दोन्ही दरवाजे बाहेरून कुलूप लावलेले होते. मी आत जाऊ शकले नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझी नातवंडे सलमा, सामिया आणि आयेशा एका खोलीत झोपल्या होत्या. दोन मुलींना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले, पण लहान आयेशा आगीत होरपळून मरण पावली.” सुदैवाने, बेलाल हुसैन यांची पत्नी नाझमा, चार महिन्यांचा मुलगा अबीर हुसैन आणि सहा वर्षांचा मुलगा हबीब हे जीव वाचवण्यात यशस्वी झाले.
बांगलादेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
ही घटना मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात वाढत चाललेल्या हिंसाचाराचे भीषण उदाहरण मानली जात आहे. देशभरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत चालल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या घटनेने संपूर्ण बांगलादेश हादरून गेला असून, राजकीय वैरातून लहान मुलांनाही लक्ष्य केले जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा