CWG 2022 INDW vs PAKW : ये तो शुरू होते ही खत्म..! भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; स्मृती मानधना चमकली!

WhatsApp Group

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघानं कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) मध्ये शानदार पुनरागमन केलं आहे. भारतानं त्यांच्या दुसऱ्या सामन्यात (INDW vs PAKW) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ४२ चेंडूत ६३ धावा करून नाबाद राहिली. तिनं ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. पावसामुळं हा सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम खेळताना पाकिस्तानचा संघ अवघ्या ९९ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या सलामीखाली भारतीय संघानं ११.४ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठलं. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियानं ३ विकेट्सनं पराभव केला होता. भारताचा आता शेवटचा साखळी सामना ३ ऑगस्ट रोजी बार्बाडोसशी होणार आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं अतिशय आक्रमक सुरुवात केली. पाच षटकांच्या पॉवरप्लेनंतर धावसंख्या बिनबाद ५२ धावा अशी होती. भारतीय फलंदाजांनी पहिल्या ५ षटकात ७ चौकार आणि ३ षटकारांचा ठोकले. मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १५वं अर्धशतक पूर्ण केलं.

हेही वाचा – मुलगा ९ महिन्यांचा झाल्यानंतर ‘दिग्गज’ क्रिकेटरनं केलं लग्न! पाहा PHOTO

९९ धावांवर आटोपला पाकिस्तानचा डाव!

तत्पूर्वी, पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. एकवेळ संघाची धावसंख्या एका विकेटवर ५० धावा होती. पण त्यांनी शेवटच्या ९ विकेट केवळ ४९ धावांत गमावल्या. सलामीवीर फलंदाज मुनिबा अलीनं सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्याचवेळी आलिया रियाझनं १८ धावांचं योगदान दिलं. भारताकडून स्नेह राणानं १५ धावांत २ बळी घेतले. डावखुरी फिरकीपटू राधा यादवनंही २ बळी घेतले. याशिवाय शफाली वर्मा, रेणुका सिंग आणि मेघना सिंग यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – CWG 2022 : “आता माझ्या बाबांनी पानाचं दुकान चालवायचं नाही”, सांगलीचा मेडलिस्ट संकेत सरगरची इच्छा!

पाकिस्ताननं भारताविरुद्ध शेवटचा विजय २०१६च्या टी-२० विश्वचषकात मिळवला होता.  २०१२मध्ये पाकिस्ताननं भारताचा एका धावेनं पराभव केला होता. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना २०१८मध्ये झाला होता, जो टीम इंडियाने ७ विकेटनं जिंकला होता.

दोन्ही संघांची Playing 11

भारतीय महिला संघ – स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कप्तान), जेमिमा रॉड्रिग्स, एस. मेघना, दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग.

पाकिस्तान महिला संघ – इरम जावेद, मुनिबा अली (विकेटकीपर), ओमामा सोहेल, बिस्माह मारूफ (कप्तान), आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​कैनत इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डियना बेग आणि अनम अमीन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment