दोन देशांकडून वर्ल्डकप खेळणारा इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

WhatsApp Group

मुंबई : ”जर मला वाटतंय, की मी चांगला खेळत नाहीये आणि संघासाठी योगदान देऊ शकत नाहीये, तर मी खेळालाच दूर करेन”, नेदरलँड्सविरुद्धच्या सीरीजपूर्वी इंग्लंडचा कप्तान इऑन मॉर्गननं हे वक्तव्य केलं होतं. आज त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा इतिहास बदलून टाकणारा कर्णधार म्हणून मॉर्गनला ओळखलं जातं. शिवाय, मैदानावर चपळ क्षेत्ररक्षक आणि कुशल रणनितीकार अशी त्याची ओळख आहे. २०१९ वर्ल्डकप खिशात घातल्यानंतर झटपट क्रिकेटमध्ये मॉर्गनची बॅट थंडावत गेली. एक विश्वविजेता कर्णधार म्हणून त्याच्याकडं पाहत जात होतं, पण मैदानावरची घसरती कामगिरी त्यानं ओळखली आणि दुसरी इनिंग खेळायची म्हणून निवृत्तीचा कठोर निर्णय घेतला.

२०१९च्या विश्वचषकानंतर मॉर्गनला गेल्या तीन वर्षांत केवळ एकच शतक झळकावता आलंय. तर ऑगस्ट २०२० पासून, त्यानं मर्यादित षटकांच्या २८ डावांमध्ये केवळ दोन अर्धशतकं झळकावली आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये तो पुरता अपयशी ठरला आहे. नुकत्याच झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातही तो दोनदा शून्यावर बाद झाला होता. याशिवाय दुखापतीमुळे तो तिसऱ्या सामन्यातही खेळू शकला नाही. या सर्व गोष्टींमुळं गेल्या काही काळापासून मॉर्गनच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दोन देशांकडून खेळलाय मॉर्गन!

इऑन मॉर्गननं जवळपास १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली आवड कायम ठेवली. दोन देशांकडून खेळलेला खेळाडू म्हणून त्याची ओळख सांगितली जाते. मॉर्गनने २००६ मध्ये आयर्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००७ मध्ये तो आयर्लंडकडून वर्ल्डकपही खेळला होता. मात्र, या स्पर्धेत त्याला फक्त ९१ धावा करता आल्या. २००९ मध्ये मॉर्गन आयर्लंड संघ सोडून इंग्लंड संघात सामील झाला.

२०१५च्या वर्ल्डकप आधी मॉर्गनला अॅलिस्टर कुकच्या जागी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होते. या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा संघ काही विशेष कामगिरी दाखवू शकला नसला तरी त्यानंतर मॉर्गनने आपल्या नेतृत्वाखाली संघाचा इतिहासच बदलून टाकला. त्याच्या नेतृत्वाखाली, इंग्लंडनं २०१९मध्ये प्रथमच एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला. फायलनमध्ये सुपरओव्हरच्या थरारनाट्यात इंग्लंडनं न्यूझीलंडकडून वर्ल्डकप हिसकावून घेतला.

मॉर्गननंतर कोण?

मॉर्गनच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर इंग्लंडला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येही नवा कर्णधार मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड क्रिकेट बोर्डानं कसोटीत बेन स्टोक्सला कॅप्टन केलं. स्टोक्सनं जो रूटची जागा घेतली. आता मॉर्गननंतर मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाची जबाबदारी जोस बटलरकडं सोपवली जाऊ शकते. याशिवाय मोईन अलीही इंग्लंडचा पुढचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे.

Leave a comment