क्रिकेटमधील ‘दिग्गज’ अंपायरचा कार अपघातात मृत्यू! सेहवाग म्हणाला, “मी जेव्हाही…”

WhatsApp Group

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे माजी पंच रूडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचं निधन झालं आहे. ७३ वर्षीय रुडी कोर्टझेन यांच्या मृत्यूचं कारण कार अपघात ठरलं. स्थानिक बातम्यांनुसार, कोर्टझेन केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान कोर्टझेन यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला धडक बसली. रिव्हर्सडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. कोर्टझेन व्यतिरिक्त या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

एलिट पॅनेलमध्ये समावेश!

रूडी कोर्टझेन हे जगातील सर्वोत्तम पंचांपैकी एक मानले जात होते. आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा अनेक वर्षांपासून समावेश होता. कोर्टझेन यांच्या अकाली निधनाच्या वृत्तानं क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. रुडी यांच्या सन्मानार्थ दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ आता पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यात काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा – Commonwealth Games 2022 : सिंधूनं फक्त मेडल नाही जिंकलंय, ८ वर्षांपूर्वीचा बदलाही घेतलाय!

कोर्टझेन यांच्या मुलानं काय सांगितलं?

कोर्टझेन यांच्या मुलानं सांगितलं, “माझे बाबा त्यांच्या काही मित्रांसह गोल्फ स्पर्धा खेळायला गेले होता आणि सोमवारीच परत येणार होते. पण त्यांनी गोल्फची दुसरी फेरी खेळण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ते एक दिवस उशिरा घरी परतणार होते.”

सेहवागनं वाहिली श्रद्धांजली..

रूडी कोर्टझेन यांच्या निधनावर वीरेंद्र सेहवागनं एक भावनिक ट्वीट केले आहे. सेहवागने लिहिलं, की कोर्टझेन यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते. मी जेव्हाही मोठे फटके खेळायचो तेव्हा ते मला टोमणे मारायचे, की समजून खेळ, मला तुझी फलंदाजी बघायची आहे. सेहवाग म्हणाला, ”एकदा त्यांना त्याच्या मुलासाठी खास ब्रँडचे क्रिकेट पॅड घ्यायचे होते. त्यांनी मला याबद्दल विचारले. मी त्यांना भेट पॅड दिले, ज्याचा त्यांना खूप आनंद झाला. एक सज्जन आणि अतिशय अद्भुत व्यक्ती. रुडी तुमची आठवण येईल.”

हेही वाचा – वाईटात वाईट..! नदीच्या पुरातून काढली अंत्ययात्रा; पाहा मन हेलवणारा VIDEO

कारकीर्द

रूडी कोर्टझेन यांनी ३३१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. ९ डिसेंबर १९९२ मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यातून त्यांनी पंचगगिरीला पदार्पण केलं. यादरम्यान, त्यांनी १०८ कसोटी क्रिकेट सामन्यात तर २०९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये कोर्टझेन यांनी काम पाहिलं आहे. इतकंच नाही तर महिलांच्या टी-२० सामन्यातही अंपायरिंगची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment