IND vs PAK : भारताकडून पाकिस्तानचा पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा पराभव!

WhatsApp Group

IND vs PAK World Cup 2023 In Marathi : जवळपास सव्वा लाख लोकांच्या उपस्थितीत मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे वर्ल्डकपच्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला मात दिली आहे. या विजयासह वनडे वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचा हा पाकिस्तानविरुद्ध आठवा विजय आहे. भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून सहज धूळ चारली. या विजयात भारतीय गोलंदाजांसह कप्तान रोहित शर्माही चमकला. भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला अवघ्या 191 धावांवर ऑलआऊट केले. त्यानंतर रोहितने फलंदाजीत आग ओकली. भारत या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

रोहितची मॅचविनिंग बॅटिंग! (IND vs PAK World Cup 2023)

पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी खणखणीत सुरुवात केली. चार चौकार ठोकत शुबमन (16) चांगल्या लयीत खेळत होता, पण शाहीन शाह आफ्रिदीने त्याला थांबवले. त्यानंतर रोहित शर्माने पाक गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. त्याने विराट कोहलीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने विराटला आपला शिकार बनवले. विराटने 16 धावा केल्या. विराटनंतर श्रेयस अय्यरने रोहितची साथ दिली आणि धावसंख्या दीडशेपार नेली. 22व्या षटकात रोहितला आफ्रिदीने झेलबाद केले. रोहितने 6 चौकार आणि 6 खणखणीत षटकारांसह 86 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर अय्यर आणि केएल राहुलने 31व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. अय्यर 3 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा – IND Vs PAK : बाबर आझम आऊट होताच अरिजित सिंगचा धुमाकूळ घालणारा डान्स!

पाकिस्तान ऑलआऊट! (IND vs PAK Final Scorecard In Marathi)

पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने शफीकला (20) बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पांड्याने इमामला (36) तंबूत पाठवले. कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला. 25 षटकांनंतर पाकिस्तानच्या 2 बाद 125 धावा होत्या. त्यानंतर बाबरने अर्धशतक पूर्ण केले. सिराजने बाबरची दांडी दूल केली. त्यानंतर बुमराहने रिझवानला अर्धशतकापासून वंचित ठेवले. रिझवानने 7 चौकारांसह 49 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यावर पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकात 191 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment