

IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजविरुद्ध रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 49 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजची कप्तान हेली मॅथ्युजने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्सच्या अप्रतिम अर्धशतकांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला 196 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात विंडीजचा संघ दीडशे धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही.
भारताचा डाव
स्मृती मंधाना आणि उमा छेत्री यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. विंडीजची फिरकीपटू करिश्मा रामहारकने उमाला बोल्ड करत ही जोडी फोडली. उमाने 4 चौकारांसह 24 धावा केल्या. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्सने स्मृतीसह धावगती वाढवली. दोघींनी 12व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. 14व्या षटकात स्मृतीने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर ती बाद झाली. तिने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या. स्मृतीनंतर जेमिमाहनेही झटपट अर्धशतक साकारले. 20व्या षटकात ती धावबाद झाली. जेमिमाहने 35 चेंडूत 73 धावा केल्या, तिने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. हरमनप्रीत 13 धावांवर नाबाद राहिली. भारताने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. विंडीजकडून करिश्मा रामहारकने 2 विकेट्स काढल्या.
हेही वाचा – सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : मध्य प्रदेशला धूळ चारत मुंबई दुसऱ्यांदा चॅम्पियन, अजिंक्य रहाणे मालिकावीर
वेस्ट इंडिजचा डाव
भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. कप्तान हेली मॅथ्यूज (1) स्वस्तात बाद झाली. दुसरी सलामीवीर कियाना जोसेफने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावांची खेळी केली. भारताच्या तितास साधूने दोन्ही सलामीवीरांना तंबुचा मार्ग दाखवला. आवश्यक धावगती वाढवण्याच्या नादात विंडीजने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. भारतानेही क्षेत्ररक्षणात झेल सोडले. स्फोटक खेळाडू डिआंड्रा डॉटिन भारताच्या विजयात अडथळा ठरत होती. तिने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. तिलाही साधूने बाद करत त्यांच्या विजयाच्या आशा धूसर केल्या. वेस्ट इंडिजला 20 षटकात 146/7 धावा करता आल्या. भारताकडून तितास साधूने 3 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना 2-2 विकेट मिळाल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!