IPL 2023 : मुंबईकडून पुन्हा 200 रन्सचं लक्ष्य पार..! ग्रीनचे शतक; आता सर्व हार्दिकच्या हातात!

WhatsApp Group

IPL 2023 MI vs SRH : आयपीएल 2023 च्या 69 व्या सामन्यात, 5 वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले. या सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या शतकी खेळीमुळे मुंबईने हैदराबादचा आठ विकेट्स राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने त्यांचे काम केले आहे पण आता प्लेऑफमधील त्यांची प्रगती पूर्णपणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे.

वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि विव्रत शर्मा यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 140 धावांची भागीदारी रचली. विवरांतने 9 चौकार आणि 2 षटकारांसह 69 तर मयंकने 8 चौकार आणि 4 षटकारांसह 83 धावांची खेळी केली. मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने शेवटच्या षटकात हैदराबादचे कंबरडे मोडले. त्याने सलामीवीरांसह 4 महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या हैदराबादचा डाव अवघ्या 200 धावांवर थांबला.

हेही वाचा – IPL 2023 RCB Vs GT : पावसामुळे मॅच रद्द झाली तर कोण क्वालिफाय करेल?

सनरायझर्स हैदराबादच्या 201 धावांच्या लक्ष्यासमोर मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, तिसर्‍याच षटकात सलामीची जोडी तुटली. इशान किशन केवळ 14 धावा करून भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर हॅरी ब्रूककडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान कॅमेरून ग्रीनच्या बॅटमधून वेगवान धावांचा पाऊस पडत होता. त्याने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित थोडा संथ खेळत होता पण त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. रोहितने  8 चौकार आणि एका षटकारासह 56 धावा केल्या.  दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. अखेर 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि याच चेंडूवर ग्रीनने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. कॅमेरून ग्रीनने अवघ्या 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि या मोसमातील सर्वात जलद शतकाचा विक्रमही केला. त्याने 8 चौकार आणि 8 षटकार मारले.  सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 25 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

Leave a comment