

Ranji Trophy | रणजी ट्रॉफी 2023-24 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईसाठी तुषार देशपांडे (Tushar Deshpande) आणि तनुष कोटियन (Tanush Kotian) यांनी मिळून इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला जाईल असा एक विक्रम रचला आहे. मुंबईसाठी दुसऱ्या डावात या दोघांनी 10 आणि 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली. मुंबईने 337 धावांवर 9वी विकेट गमावली होती, पण यानंतर तुषार आणि तनुषने मिळून धावसंख्या 569 धावांवर नेली. तनुष 120 धावा करून नाबाद परतला, तर तुषार देशपांडे 123 धावा करून बाद झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात 10 आणि 11 क्रमांकाच्या फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे.
विशेष म्हणजे ही कामगिरी दोन्ही वेळा भारतीय खेळाडूंनीच केली आहे. 78 वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ही कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. यापूर्वी चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी यांनी 1946 मध्ये भारतीय विरुद्ध सरे सामन्यात ही कामगिरी केली होती.
ओव्हल मैदानावर खेळलेला तो सामनाही ऐतिहासिक होता कारण तो सामना भारतीयांनी 9 विकेट्सने जिंकला होता. तेव्हा भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्यही मिळाले नव्हते. मुंबई आणि बडोदा यांच्यातील रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्यपूर्व सामना शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी, मुंबई येथे खेळवला जात आहे. मुंबईने पहिल्या डावात 384 धावा केल्या, प्रत्युत्तरात बडोद्याला पहिल्या डावात 348 धावांवरच रोखले.
हेही वाचा – कल्याण–शिळ रस्त्याला संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव
पहिल्या डावातील आघाडीसह मुंबई आता बडोद्यापेक्षा 605 धावांनी पुढे आहे. बडोद्याला सामना जिंकण्यासाठी 606 धावा कराव्या लागतील, त्यामुळे येथून मुंबईचा विजय निश्चित असून उपांत्य फेरीचे तिकीटही पक्के झाले आहे. तनुषने 129 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या, तर तुषार देशपांडे 129 चेंडूंत 10 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 123 धावा करून बाद झाला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!