

Pak vs Eng 2nd Test : इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना पाकिस्तान क्रिकेट संघाला कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. रावळपिंडी कसोटीतील पराभवानंतर मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही संघाचा पराभव झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिलेल्या ३५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात ३२८ धावांवरच गारद झाला. सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूने इंग्लंडच्या कर्णधारासोबत असे काही केले, ज्यानंतर त्याच्यावर टीका होत आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलतानमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद अलीने असे काही केले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सामना संपल्यानंतर जेव्हा इंग्लंडच्या कर्णधाराने त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. यानंतर तो काही बोलला, त्यानंतर स्टोक्सने काही अडचण नसल्याचे उत्तर दिले.
हेही वाचा – आता इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येणार TV..! जाणून घ्या काय आहे ही सुविधा
व्हिडिओ होतोय व्हायरल
पाकिस्तानी खेळाडूंची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता लोक ती सोशल मीडियावर शेअर करत आहेत. खेळाच्या भावनेप्रमाणे सामन्यादरम्यान काहीही झाले तरी दोन्ही संघांचे खेळाडू सामना संपल्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन करतात. हस्तांदोलन करण्यासाठी पुढे गेलेल्या स्टोक्सला पाकिस्तानचा खेळाडू काय म्हणाला, हे दोघांपैकी कोणीही बोलल्यावरच कळेल.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 12, 2022
पाकिस्तानने गमावली मालिका
मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने २८१ धावा केल्या तर पाकिस्तानचा संघ २०२ धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात २७५ धावा केल्यानंतर इंग्लिश संघाने यजमानांसमोर ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हा सामना चार दिवसांत संपला आणि इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली.