VIDEO : दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर ऑस्ट्रेलियाच्या रुग्णालयात दाखल; म्हणाला, “ही माझी शेवटची…”

WhatsApp Group

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला ऑस्ट्रेलियामध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानावर असल्यापासून तो गुडघ्याच्या गंभीर दुखापतीशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा या समस्येमुळं त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यावेळी शोएबच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर शोएबनं एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचं मत समोर आलं.
शोएबनं सांगितलं, ”गु़डघ्याच्या दुखापतीमुळं माझं करिअर लवकर संपलं. अन्यथा मी आणखी चार-पाच वर्षे खेळू शकलो असतो.” शोएबला गेल्या दहा वर्षांपासून गुडघ्याचा त्रास आहे. आता त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर शोएबनं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाला शोएब?

या व्हिडिओमध्ये शोएब खूपच भावूक झाला होता. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं त्यानं सांगितलं. शोएबनं चाहत्यांना तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं. शोएब व्हिडिओमध्ये म्हणाला, ”मी आणखी चार ते पाच वर्ष क्रिकेट खेळू शकलो असतो, पण मला माहीत होतं की जर मी असं केलं असतं तर मी व्हीलचेअरवर असतो. त्यामुळेच मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मी शस्त्रक्रियेतून बाहेर आलो आहे, ५-६ तासांची शस्त्रक्रिया झाली, दोन्ही गुडघे दुखत आहेत, पण तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. ही माझी शेवटची शस्त्रक्रिया असेल, अशी मला मला आशा आहे. मला वेदना होत आहेत. निवृत्तीच्या ११ वर्षानंतरही मी अत्यंत वेदनेत आहे.”

हेही वाचा – क्रिकेटमधील ‘दिग्गज’ अंपायरचा कार अपघातात मृत्यू! सेहवाग म्हणाला, “मी जेव्हाही…”

शोएब अख्तरची कारकीर्द

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला शोएब २०००च्या दशकातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जात होता. त्याच्या गोलंदाजीच्या वेगासमोर अनेक फलंदाज हतबल व्हायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही शोएबच्या नावावर आहे. शोएबनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४ टी-२०, १६३ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले. त्याच्‍या नावावर टी-२० क्रिकेटमध्‍ये २१, एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये २४७ आणि कसोटीमध्‍ये १७८ विकेट्स आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment