Biker Chased By Dog Dies : कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील अथणी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर मागे लागलेल्या भटक्या कुत्र्यामुळे एका 44 वर्षीय दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला असून, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव विश्वनाथ शिरोळ असे असून, ते अथणी शहरातील कुंबार गल्ली परिसरात वास्तव्यास होते. ही घटना 15 जानेवारी रोजी घडली होती. मात्र, सुरुवातीला हा अपघात सामान्य दुचाकी अपघात असल्याचे मानले जात होते. काही दिवसांनंतर परिसरातील CCTV फुटेज तपासले असता खरी भीषण कहाणी उघड झाली.
CCTV फुटेजमध्ये उघड घटना
CCTV मध्ये स्पष्टपणे दिसते की, विश्वनाथ शिरोळ आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक एक भटका कुत्रा त्यांच्या मागे लागतो. कुत्र्याच्या हल्ल्याच्या भीतीने त्यांनी वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भीतीमुळे ते घाबरले आणि दुचाकीवरील ताबा सुटला.
हेही वाचा – भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू; भाडे, सुविधा, वेग आणि जेवण… सगळंच विमानासारखं!
काही सेकंदांतच दुचाकी थेट एका घराच्या भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विश्वनाथ यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आधी एकदा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्यांना कुत्र्यांची तीव्र भीती वाटत होती. हीच भीती त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली, यामुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले आहे.
विश्वनाथ शिरोळ हे आपल्या कुटुंबाचे एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा संताप – प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर अथणी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “आज विश्वनाथ गेले, उद्या कुणाची पाळी?” असा सवाल उपस्थित करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा तपास अथणी पोलीस ठाणे करत असून, CCTV फुटेजच्या आधारे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा