UP Momos Viral News : उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक घटनेने पालकांसह संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. फक्त मोमोस खाण्याच्या सवयीमुळे सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने कुटुंबाचे तब्बल 85 लाख रुपयांचे दागिने अनोळखी लोकांना देऊन टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात घडली आहे. या प्रकरणातील तक्रारदार विमलेश मिश्र हे वाराणसी येथील मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा मोमोस खाण्याचा प्रचंड शौकीन असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.
विमलेश मिश्र यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक भागात मोमोस विक्री करणारे तीन व्यक्ती त्यांच्या मुलाच्या या सवयीचा गैरफायदा घेत होते. सुरुवातीला त्यांनी मुलाला मोफत मोमोस देण्याचं आमिष दाखवलं. काही दिवसांनंतर, “घरातून दागिने आणले तर आयुष्यभर मोमोस मोफत देऊ” असं सांगत त्या मुलाला हळूहळू जाळ्यात ओढण्यात आलं.
बालमनाच्या निष्पापपणाचा फायदा घेत, त्या मुलाला घरातील कपाटातून दागिने आणायला लावण्यात आले. काही दिवसांतच, कुटुंबातील सर्व मौल्यवान दागिने त्याने त्या मोमोस विक्रेत्यांना दिले, आणि कुणालाही याची कल्पना आली नाही.
या घटनेचा पर्दाफाश तेव्हा झाला, जेव्हा विमलेश मिश्र यांच्या बहिणी घरी आल्या आणि स्वतःचे दागिने मागितले. कपाट उघडताच कुटुंबाला जबर धक्का बसला. संपूर्ण दागिन्यांचा साठा गायब होता. चौकशी केल्यानंतर, मुलाने सत्य सांगितलं की, मोमोस मोफत मिळावेत म्हणून त्याने सर्व दागिने मोमोस विक्रेत्यांना दिले.
यानंतर विमलेश मिश्र यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी तीनही संशयितांची नावे नमूद करत, दागिन्यांची सध्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास सुरू केला आहे. बालकाचा भावनिक आणि मानसिक गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ही घटना केवळ आर्थिक फसवणुकीची नसून, लहान मुलांच्या सवयी, पालकांची सतर्कता आणि समाजातील वाढती लालसा यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा